संग्रहित छायाचित्र
जीनिव्हा: भारतीय वंशाचे उद्योगपती, ब्रिटनमधील सर्वाधिक धनाढ्य हिंदुजा कुटुंबाची (Hinduja Family) शनिवारी स्वीत्झर्लंडच्या उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. विशेष म्हणजे एक दिवस अगोदर म्हणजे शुक्रवारी स्वीसमधील कनिष्ठ न्यायालयाने हिंदुजा कुटुंबातील चौघांना नोकरांचे शोषण केल्याप्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
उद्योगपती प्रकाश हिंदुजा, पत्नी कमल हिंदुजा यांना साडेचार वर्षांची तर त्यांचा मुलगा अजय, सून नम्रता यांना चार वर्षांची शिक्षा झाली होती. मात्र, त्यांना ताब्यात घेतले नव्हते. यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. हिंदुजा कुटुंबाच्या प्रवक्त्याने सांगितले की, उच्च न्यायालयाने सर्व गंभीर आरोप फेटाळून लावले आहेत. तक्रारदारांनी सर्व आरोप मागे घेतले आहेत. कोर्टातील साक्षीवेळी आपणाला समजत नसलेल्या विधानांवर स्वाक्षरी घेतल्याचे तक्रादारांनी सांगितले.
या अगोदर हिंदुजा कुटुंबाच्या स्वीत्झर्लंड व्हिलामध्ये काम करणाऱ्या नोकरांनी आपले शोषण केल्याचा आरोप केला होता. त्यापैकी बहुतेक भारतातील निरक्षर लोक होते. खालच्या न्यायालयाने मानवी तस्करीचे आरोप फेटाळून लावले होते. मात्र, नोकराच्या शोषणाचे आरोप ग्राह्य धरले होते. निकालाच्या वेळी हिंदुजा कुटुंबातील चारही सदस्य न्यायालयात नव्हते. मात्र, त्यांचा व्यवस्थापक आणि पाचवा आरोपी नजीब झियाजी हजर होता. त्यालाही १८ महिन्यांची शिक्षा झाली होती.
तुरुंगवासाची शिक्षा झालेल्यामध्ये उद्योगपती प्रकाश हिंदुजा, पत्नी कमल हिंदुजा, मुलगा अजय, त्याची पत्नी नम्रता यांचा समावेश होता. हिंदुजा कुटुंबावर नोकरांची तस्करी आणि शोषण केल्याचा आरोप होता.जीनिव्हात तलावाच्या किनाऱ्यावरील हिंदुजा कुटुंबाच्या व्हिलामध्ये ते कामाला होते. न्यायालयाने त्यांना घरगुती नोकरांचे शोषण केल्याबद्दल दोषी ठरवले. हिंदुजा कुटुंबावर नोकरांचे पासपोर्ट जप्त करणे, स्वीस फ्रँक्सऐवजी रुपयात पगार देणे, व्हिलामधून बाहेर जाण्यापासून रोखणे आणि अत्यंत कमी पगारावर जास्त तास काम करण्याची बळजबरी करणे असे आरोप होते. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, हिंदुजा कुटुंबाविरुद्ध मानवी तस्करी प्रकरणी सोमवारपासून खटला सुरू झाला. पीडितांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी न्यायालयाला असे सांगितले होते की, काही वेळा स्वयंपाकी, घरगुती मदतनिसांना दिवसा १५ ते १८ तास किंवा विनासुटी काम करण्यास भाग पाडले जात होते. त्यांचा पगार स्वीस कायद्यानुसार ठरविलेल्या रकमेच्या दहाव्या भागापेक्षा कमी होता. कर्मचारी रिसेप्शनवर उशिरापर्यंत काम करायचे आणि कधीकधी व्हिलाच्या तळघरात जमिनीवर गादीवर झोपायचे. हिंदुजा कुटुंबीयांच्या गरजेनुसार त्यांना प्रत्येक वेळी उपस्थित राहणे आवश्यक होते. वकिलाने कमल हिंदुजा यांनी निर्माण केलेल्या भीतीच्या वातावरणाचाही उल्लेख केला. सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले होते की, हिंदुजा कुटुंबाने नोकरापेक्षा त्यांच्या कुत्र्यावर जास्त खर्च केला आहे. कर्मचाऱ्यांना प्रतिदिन ६५४ रुपये म्हणजे वार्षिक सुमारे २ लाख ३८ हजार पगार मिळत होता. कागदपत्रांवरून असे दिसते की कुत्र्याच्या देखभाल, खाण्यावर वर्षाला ८ लाख रुपये खर्च केले जात होते. या साहाय्यकांचे पासपोर्ट जप्त केल्याचे वकिलाने सांगितले. अनेक कर्मचाऱ्यांना फक्त हिंदी बोलता येत असल्याने त्यांना कुठेही जाता येत नव्हते. ‘फोर्ब्स’ च्या माहितीनुसार आयटी, मीडिया, रिअल इस्टेट आणि आरोग्य उद्योगात कार्यरत असलेल्या हिंदुजा कुटुंबाची संपत्ती १ लाख ६७ कोटी रुपये आहे.