संग्रहित छायाचित्र
पोलंडच्या सार्वत्रिक निवडणुकीत (Poland's election) झालेले मतदान (voting)आणि मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज यातून देशात सत्ताधारी नॅशनलिस्ट लॉ अँड जस्टीस पक्षाची सत्ता जाऊन विरोधकांची आघाडी सत्तेवर येणार हे स्पष्ट झाले आहे. रविवारी (दि. १५) पोलंडमध्ये सार्वत्रिक मतदान झाले. यावेळी ७३ टक्के मतदारांनी आपला मताधिकार बजावला. पोलंडच्या ३४ वर्षांच्या लोकशाहीच्या इतिहासातएवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान झालेले नाही.
युरोपियन युनियन आणि युक्रेनसोबतचे संबंध बिघडवून ठेवणे, अर्थकारण बिघडवणे आणि बेरोजगारी, महागाई अशा अनेक मुद्यांवर सत्ताधारी पक्षाला कंटाळलेल्या मतदारांनी आपला राग मतपेटीच्या माध्यमातून व्यक्त केला असल्याचे पोलंडच्या राजकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे. आजवरील इतिहासात ७३ टक्के मतदान कधीच झाले नव्हते. यापूर्वी १९८९ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत ६३ टक्के मतदान झाले होते. आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्याची ही सर्वोच्च आकडेवारी होती.
मतदानानंतरच्या चाचण्यांत नागरिकांनी मागच्या ८ वर्षांपासून सत्तेवर असलेल्या नॅशनॅलिस्ट लॉ अँड जस्टीस पक्षाची सत्ता उलथवून टाकण्याचा निर्धारच मतदानातून व्यक्त केला असल्याचे उघड झाले आहे. नॅशनॅलिस्ट लॉ अँड जस्टीस पक्षाच्या सरकारने मागच्या दोन टर्ममध्ये जी ध्येयधोरणे राबवली त्याला नागरिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असल्याची चर्चा आहे. नियमबाह्यपणे युरोपियन युनियनला करण्यात आलेली आर्थिक मदत, महागाई रोखण्यात आलेले अपयश आणि समाजात विघटन घडवण्यासाठी केलेले प्रयत्न यामुळे पोलंडच्या जनतेने अनेकदा रस्त्यांवर उतरत निदर्शनेही केली होती. मात्र सत्ताधारी पक्षाच्या सरकारने या असंतोषाची दखल घेतली नाही.
दरम्यान मतदानोत्तर चाचण्यांमुळे पोलंडचे चलन 'झलोटी' सोमवारी डॉलर आणि युरोच्या तुलनेत वधारले. नवे सरकार सत्तेत आल्यावर पोलंडच्या युक्रेनसोबतच्या संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या रशिया-युक्रेन युद्धात पोलंडने युक्रेनची बाजू घेतली आहे. सप्टेंबर महिन्यात युक्रेनमधील नवा गहू पोलंडच्या बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत सत्ताधारी नॅशनॅलिस्ट लॉ अँड जस्टीस पक्षाच्या विरोधात तीन समविचारी पक्षांची आघाडी मैदानात उभी राहिली. पोलंडच्या मध्यवर्ती सभागृहाच्या ४६० जागांपैकी २४८ जागा या आघाडीला मिळण्याची शक्यता आहे. विरोधकांची आघाडी सत्तेवर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच नॅशनॅलिस्ट लॉ अँड जस्टीस पक्षाचे प्रचारप्रमुख जोनाचीम ब्रूडझिन्स्की यांनी, आम्हीच सर्वाधिक जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरू, अशी ग्वाही दिली आहे. मत्यूझ मोरावयकी यांच्या नेतृत्वाखाली नॅशनॅलिस्ट लॉ अँड जस्टीस पक्षाचे सरकार पुन्हा सत्तेत येईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे. सर्वाधिक सदस्य निवडून आलेल्या पक्षाला अथवा पक्षांच्या आघाडीला राष्ट्राध्यक्ष अँड्रेज दुडा सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण देतील. त्यासाठी पोलंडमध्ये ३० दिवसांचा अवधी दिला जातो.
नॅशनॅलिस्ट लॉ अँड जस्टीस पक्षाला ३६.६ टक्के मतदान झाले, तर विरोधकांच्या आघाडीला एकत्रित बहुमत मिळेल एवढे मतदान झाले आहे. युरोपियन कौन्सिलचे माजी अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांच्या सीविक को-ॲॅलिशनला ३१ टक्के, सेंट्रिस्ट आघाडीला १३.५ टक्के आणि डाव्या पक्षाला ८.६ टक्के मतदान झाले. फार राईट कॉनफेडरेशनला ६.५ टक्के मतदान झाले आहे. निवडणूक आयोग मंगळवारी (दि. १७) निकाल जाहीर करणार आहे. रविवारच्या मतदानानंतर डोनाल्ड टस्क यांनी नॅशनॅलिस्ट लॉ अँड जस्टीस पक्षाची एकाधिकारशाही संपुष्टात आली असून पोलंडची जनता आता मोकळा श्वास घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. टस्क यांच्या सीविक को- एलिशनचे उपाध्यक्ष सेझारी टॉमझिक यांनी नॅशनॅलिस्ट लॉ अँड जस्टीस पक्ष सत्तेसाठी काहीही करू शकतो. त्यांनी सर्वसामान्य जनतेचा कौल मान्य करायला हवा, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.