संग्रहित छायाचित्र
ढाका: बांगलादेशाला भारत आणि इतर शेजारी देशांशी चांगले संबंध हवे आहेत. मात्र, हे संबंध न्याय, समानतेच्या आधारावर असले पाहिजेत, अशी भूमिका बांगला देशातील अंतरिम सरकारचे प्रमुख आणि नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांनी व्यक्त केले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
काही दिवसांपूर्वी बांगलादेशमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर शेख हसीना यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा देत देश सोडावा लागला होता. शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. शेख हसीना यांनी बांगलादेश सोडल्यानंतर भारतात आश्रय घेतला आहे. बांगलादेशचे अंतरिम सरकारचे प्रमुख डॉ.मुहम्मद युनूस यांनी एका मुलाखतीत आपली मते मांडली आहेत.
बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेतल्यानंतर युनूस यांना विविध देशाच्या प्रमुखांकडून अभिनंदनाचे फोन आले होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही अभिनंदन केले होते. आम्हाला भारत आणि इतर सर्व शेजारी देशांशी चांगले संबंध हवे आहेत. हे संबंध न्याय, समानतेवर आधारित असले पाहिजे असे सांगून युनूस म्हणाले की, आम्ही पूर व्यवस्थापनावर द्विपक्षीय सहकार्यासाठी भारताबरोबर आधीच उच्चस्तरीय चर्चा सुरू केली आहे. दक्षिण आशियातील प्रादेशिक सहकार्य वाढावे यासाठी सार्ककरता आम्ही पुढाकार घेतला आहे. सार्कमध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांचा समावेश आहे. जगाने बांगलादेशला सन्माननीय लोकशाही व्यवस्था असलेला देश म्हणून ओळखल पाहिजे, अशी आमची इच्छा आहे.
अंतरिम सरकारने बांगलादेशमध्ये निवडणूक प्रणालीसह सहा महत्त्वाच्या क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी सहा आयोग स्थापन करण्यासाठी पावले उचलली आहेत. युनूस म्हणाले की, अंतरिम सरकारने बांगलादेशातील निवडणूक यंत्रणा, न्यायव्यवस्था, पोलीस प्रशासनसह सहा प्रमुख क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यासाठी आयोग स्थापन करण्यासाठी पावले उचलली आहेत. हे सहा आयोग १ ऑक्टोबरपासून काम सुरू करतील. पुढील तीन महिन्यांत त्यांचे काम पूर्ण करतील. या सुधारणांचा उद्देश सर्वांना समान हक्क निश्चित करणे हा आहे.