संग्रहित छायाचित्र
मॉस्को/ वॉशिंग्टन : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय रशिया दौऱ्यावर आहेत. सोमवारी (८ जुलै) रशियात दाखल झालेल्या नरेंद्र मोदी यांचे रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी जोरदार स्वागत केले. मोदी यांच्या या दौऱ्यावर जगाचे लक्ष आहे. मोदी आणि पुतिन यांची ही मैत्री अमेरिकेसाठी चिंतेचा विषय आहे. भारताचे अमेरिका आणि रशिया दोघांशी चांगले संबंध आहेत. अमेरिका आणि रशिया यांच्या संबंधातील तणाव जगजाहीर आहे. मोदी यांची पुतिन यांच्यासोबतची जवळीक अमेरिकेच्या चिंतेचा विषय आहे.
रशियात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याबरोबर अनौपचारिक बैठक झाली. सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. अमेरिकेसह युरोपियन देश पुतिन यांना एकटे पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनीही याविषयी अधिकृतपणे भाष्य केले आहे. रशियन राष्ट्राध्यक्षांसोबत पंतप्रधान मोदी यांनी काय चर्चा केली? त्याची आम्ही माहिती घेऊ. भारत-रशिया संबंधांमुळे आम्ही चिंतित आहोत, हे अमेरिकेने आधीच स्पष्ट केले असल्याचे मॅथ्यू मिलर म्हणाले आहेत. आम्हाला भारताकडून काय अपेक्षा आहे, ते सुद्धा मॅथ्यू मिलर यांनी स्पष्ट केले आहे. भारत किंवा अन्य कुठल्याही देशाने रशियाला संयुक्त राष्ट्र चार्टर आणि युक्रेनच्या अखंडतेचा सन्मान करायला सांगायला हवे. भारत आमचा रणनितीक भागीदार असून त्यांच्यासोबत आम्ही स्पष्टपणे बोलतो. रशियासोबत भारताचे जे संबंध आहेत, त्याबद्दल आम्हाला वाटणाऱ्या काही चिंतासुद्धा आहेत, असेही मॅथ्यू मिलर म्हणाले.
“मी एकटा आलेलो नाही, माझ्याबरोबर १४० कोटी लोकांचे प्रेम !
मॉस्कोत आयोजित कार्यक्रमाला संबोधित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, “मी इथे येताना एकटा आलेलो नाही. मी माझ्याबरोबर काही गोष्टी घेऊन आलोय. मी माझ्याबरोबर भारतातल्या मातीचा गंध घेऊन आलोय, तुमच्यासाठी १४० कोटी भारतीयांचे प्रेम घेऊन आलोय. तिसऱ्यांदा पंतप्रधान बनल्यानंतर हा माझा परदेशातील भारतीय समुदायाशी पहिलाच संवाद आहे. हा खूप आनंददायी क्षण आहे. ९ जुलै असून मला तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन आज बरोबर एक महिना झाला आहे. मी आज तुम्हा सर्वांसमोर ठामपणे सांगेन की, माझ्या पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या कार्यकाळात मी तिप्पट ताकद लावून काम करेन. आधीपेक्षा तिप्पट वेगाने काम करेन. देशाचा विकास वेगाने करण्याची मी शपथ घेतली असल्याचे म्हटले आहे.
एकाच कृतीतून चीनला दाखवून दिली जागा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोमवारी मॉस्को विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. भारत-रशियाची जवळीक अमेरिका तसेच अनेक युरोपियन देशांना पसंत नाही. त्याचवेळी रशियाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनलाही ही गोष्ट आवडत नाही. अलीकडच्या काळात रशिया आणि चीनचे संबंध सुधारले आहेत. रशिया आणि चीनमध्ये व्यापारसुद्धा वाढला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणातील घडामोडींमुळे दोन्ही देश जवळ आले आहेत, पण यामुळे आपण भारतापेक्षा रशियासाठी अधिक जवळचे आहोत, अशी चीनची भावना झाली आहे. हा भ्रम रशियाने मोडला. सोमवारी मोदी मॉस्को विमानतळावर पोहोचले, तेव्हा रशियाचे उपपंतप्रधान डेनिस मँटुरोव्ह तिथे मोदींच्या स्वागताला उपस्थित होते. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या स्वागतालाही रशियाचे एक उपपंतप्रधान उपस्थित होते. पण डेनिस मँटुरोव्ह त्यांच्यापेक्षा वरिष्ठ आहेत. मोदी यांच्या स्वागताला डेनिस मँटुरोव्ह यांनी उपस्थित राहणे, त्यांना कारमधून हॉटेलपर्यंत नेऊन सोडणे यातून रशियासाठी भारत किती महत्त्वाचा देश आहे, तो संदेश जातो. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यानंतर स्थान असलेल्या व्यक्तीने मोदी यांचे स्वागत करण्यातून रशियाने चीनलाही स्पष्ट संदेश दिला आहे.
अमेरिकेचा दबाव झुगारून भारताची तेलखरेदी
२०२२ साली रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले. भारताने रशियापासून अंतर राखावे, यासाठी अमेरिकेने सतत भारतावर दबाव टाकला. अमेरिकेचा हा दबाव भारताने कधीच जुमानला नाही. भारताने रशियासोबतचे आपले जुने संबंध आणि आर्थिक गरजांचे दाखले दिले. अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी रशियावर आर्थिक बहिष्कार घातला. तसेच रशियासोबत व्यवहार करणाऱ्या देशांवरही बहिष्कार घातला. याला न जुमानता भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात सवलतीच्या दरात तेलखरेदी केली. त्यामुळे रशियाला महसूल मिळाला. भारताला स्वस्तात तेल मिळाले. ज्यामुळे दोन्ही देशांचा फायदा झाला. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर भारताने रशियाला शांततामय मार्गाने तोडगा काढण्याचा सल्ला दिला. अमेरिकेने युक्रेनची बाजू घेतली. युक्रेनला शस्त्रास्त्र दिली.
भारत-रशिया जवळीक !
शीतयुद्धाच्या काळापासून भारताचे रशियासोबत घनिष्ठ संबंध आहेत. रशिया भारताचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार देश आहे. युक्रेन युद्धामुळे रशियाच्या लष्करी स्त्रोतांवर काही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे भारताला होणारी शस्त्रास्त्र निर्यात काही प्रमाणात कमी झाली आहे. रशिया एका बाजूला युद्ध लढत असताना दुसऱ्या बाजूने भारताने आर्थिक ताकद देण्याच काम केलय. रशिया नेहमीच भारताच्या बाजूने उभा राहिला आहे. भारतानेसुद्धा आतापर्यंत रशियाला साथ दिली आहे. चीन आणि पाकिस्तानच्या कारवायांविरोधात रशियाने नेहमीच भारताची बाजू घेतलेली आहे.