संग्रहित छायाचित्र
न्यूयॉर्क: अमेरिकेतील हिंडेनबर्ड रिसर्च संस्थेने अदाणी समुहावर आरोप केल्यानंतर शेअर बाजार गडगडला होता. आता पुन्हा थेट गौतम अदाणी त्यांचा पुतण्या सागर अदाणी व आणखी सात जणांच्या विरूद्ध २ हजार कोटी रुपयांची लाच दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या वृत्तानंतर शेअर बाजार गडगडला. या प्रकरणात सामील असलेल्या षडयंत्रकर्त्यांनी गौतम अदाणी यांना 'न्युमेरो युनो' आणि 'द बिग मॅन' या सांकेतिक नावांनी खासगीरित्या संबोधले होते. तर लाच देण्याची प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी सागर अदाणी यांनी आपला मोबाइल फोन वापरला होता.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने या प्रकरणी अदाणी समूहाशी संपर्क साधला, मात्र त्यावर अदाणी समूहाकडून उत्तर दिले गेले नाही. याआधी अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेने आरोप केले होते, अदाणी समूहाने त्यावेळी हे आरोप तात्काळ फेटाळून लावले होते. अमेरिकेतील न्यूयॉर्क ईस्टर्न डिस्ट्रिक्ट अॅटर्नी जनरल लिसा एच. मिलर यांनी या बाबत एक प्रसिद्धी पत्रक काढून माहिती दिली. लिसा यांनी पत्रकारांना सांगितले की “भारताच्या सरकारी अधिकाऱ्यांना दोन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकची लाच देणे, गुंतवणूकदार आणि बँकाँशी खोटे बोलणे आणि अब्जावधी रुपये त्यातून गोळा करण्याचा आरोप गौतम अदाणी आणि इतरांवर ठेवण्यात आला आहे.”
यामध्ये अमेरिकेच्या सरकारी वकिलांनी म्हटले की, अदाणी आणि अदाणी ग्रीन एनर्जीमधील कार्यकारी अधिकारी आणि माजी सीईओ विनीत जैन यांनी कर्जदार आणि गुंतवणूकदारांपासून हा भ्रष्टाचार लपवून ठेवला आणि ३ अब्ज डॉलरपेक्षा अधिक कर्ज आणि रोखे गोळा केले. गौतम अदाणी यांच्याशिवाय या आरोपात सहा लोकांची नावे आहेत. अदाणी ग्रीन एनर्जी लि. चे सीईओ विनीत जैन, रंजीत गुप्ता, रुपेश अग्रवाल, सिरिल कॅबनेस, सौरभ अग्रवाल आणि दीपक मल्होत्रा यांच्या नावाचा समावेश आहे.
अदाणी आणि त्यांचा पुतण्या सागर अदाणी यांच्यासह इतर सात जणांनी सौर ऊर्जा वितरीत करण्याचे कंत्राट मिळविण्यासाठी भारतातील सरकारी अधिकाऱ्यांना २,०२९ कोटी रुपयांची (२६५ दशलक्ष डॉलर्स) लाच देऊ केली. न्यूयॉर्कच्या ईस्टर्न डिस्ट्रिक्ट, यूएस ॲटर्नी कार्यालयाच्या यूएस अतिरिक्त सहायक ॲटर्नी जनरल लिसा एच मिलर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे हि माहिती दिली.
अदानी यांच्या विरोधात अटक वॉरंट
गौतम अदाणी यांच्यावर करण्यात आलेल्या दोषारोपानुसार, हा लाचेचा पैसा गोळा करण्यासाठी अदानी अमेरिकन, परदेशी गुंतवणूकदार आणि बँकांशी खोटे बोलत असल्याचा आरोप आहे. सागर आणि विनीत हे अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे अधिकारी आहेत. सागर हा गौतम अदानी यांचा पुतण्या आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, गौतम अदानी आणि सागर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. अमेरिकन गुंतवणूकदारांचा पैसा या प्रकल्पात गुंतवला गेल्याने अमेरिकेत गुन्हा दाखल झाला आणि अमेरिकन कायद्यानुसार तो पैसा लाच म्हणून देणे गुन्हा आहे. बुधवारीच, अदानी यांनी २० वर्षांच्या ग्रीन बाँडच्या विक्रीतून ६०० मिलियन डॉलर्स जमा करण्याची घोषणा केली होती. काही तासांनंतर, त्यांच्यावर फसवणुकीचा आरोप झाला.
सन २०२० ते २०२४ दरम्यान, अदानींसह सर्व आरोपींनी भारत सरकारकडून सौर ऊर्जा करार मिळविण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना २५० मिलियन डॉलर्स लाच देण्याचे मान्य केले. या प्रकल्पातून २० वर्षांत २ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नफा मिळण्याची अपेक्षा होती. ही योजना पुढे नेण्यासाठी अदानी यांनी भारत सरकारच्या अधिकाऱ्याची भेट घेतली. सागर आणि विनीत या योजनेवर काम करण्यासाठी अनेक बैठका घेतात. कोर्टाने म्हटले आहे की, सिरिल कॅबनिस, सौरभ अग्रवाल, दीपक मल्होत्रा आणि रूपेश अग्रवाल यांनी लाचखोरी योजनेच्या ग्रँड ज्युरी, एफबीआय आणि यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन (एसईसी) च्या तपासात अडथळा आणण्याचा कट रचला. या चौघांनीही योजनेशी संबंधित ईमेल, संदेश आणि विश्लेषणे डिलीट केली. अदानी ग्रीन एनर्जीने करारासाठी निधी देण्यासाठी यूएस गुंतवणूकदार आणि आंतरराष्ट्रीय कर्जदारांकडून एकूण ३ अब्ज डॉलर्स जमा केले.
कोण आहे सागर अदाणी
गौतम अदानी यांचा पुतण्या सागरने ब्राउन युनिव्हर्सिटी यूएसमधून अर्थशास्त्राची पदवी घेतली आहे. सागर सन २०१५ मध्ये अदानी समूहात सामील झाले. सागर समूहाचे ऊर्जा व्यवसाय आणि वित्त व्यवस्था सांभाळतात. ते अक्षय ऊर्जा व्यवसायावर लक्ष केंद्रित करतात आणि सन २०३० पर्यंत कंपनीला जगातील सर्वात मोठी अक्षय ऊर्जा उत्पादक बनवण्याची त्यांची योजना आहे.
१८ नोव्हेंबर पासूनच अदानीं ऊर्जा समभागांमध्ये घसरण
अमेरिकेच्या न्याय विभागाचे आरोप बुधवारी रात्री बाहेर आले असले तरी दोन दिवस आधी १८ नोव्हेंबरला अदानी एनर्जीच्या शेअर्समध्ये घसरण झाली होती. अदानी एनर्जी सोल्युशन्सचे समभाग १.३३ टक्केच्या घसरणीसह बंद झाले. अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्ये २.३३ टक्क्यांची घसरण झाली. तो १४५७ रुपयांवर बंद झाला. अदानी टोटल गॅसचे शेअर्स २.१३ टक्क्यांच्या घसरणीसह ६६९.६० रुपयांवर बंद झाले.