संग्रहित छायाचित्र
किव्ह : युक्रेनने रशियावरील हल्ल्याची तीव्रता वाढवली असून रशियाची राजधानी मॉस्कोसह देशातील १५ प्रांतांवर १५८ ड्रोनने हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून रशियाने युक्रेनच्या खार्किव्ह शहरावर केलेल्या हल्ल्यात सहा नागरिक ठार झाले आहेत.
गेल्या अडीच वर्षांत युक्रेनने रशियावर एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रोनने हल्ला करण्याची ही पहिली वेळ आहे. हल्ल्याबाबत मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन म्हणाले, शहरावर ११ ड्रोनने हल्ला केला असून यात तेल शुद्धीकरण केंद्र आणि एका तांत्रिक कक्षाला लक्ष्य करण्यात आले. तेल शुद्धीकरण कारखान्यावर हल्ल्यानंतर स्फोट झाला. त्यानंतर तेथून दाट धुराचे लोट उठताना दिसत होते. युक्रेनने १५ प्रांतांवर १५८ ड्रोनच्या मदतीने हल्ला केला. रशियाच्या दाव्यानुसार हे सर्व ड्रोन पाडण्यात आले आहेत. हल्ल्यात जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
हल्ल्यानंतर रशियाने रविवारी युक्रेनमधील दुसरे मोठे शहर असलेल्या खार्किव्ह शहरावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा, गाईड बॉम्बचा हल्ला केला. या हल्ल्यात किमान ४७ लोक जखमी झाले असून यात ५ मुलेही आहेत. हल्ल्यातील जखमींची संख्या वाढू शकते. या हल्ल्यात खार्किव्हमध्ये १० ठिकाणी स्फोट झाले. गेल्या ४८ तासांतील रशियाचा हा दुसरा मोठा हल्ला आहे. याआधी शुक्रवारच्या हल्ल्यात युक्रेनमधील ६ जणांचा मृत्यू झाला होता, तर ५९ जण जखमी झाले होते. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमिर झेलेन्स्की यांना आता रशियातील आतील भागात हल्ला करायचा आहे. यासाठी ते अमेरिकेवर मदतीसाठी दबाव आणत आहेत. युक्रेनने रशियाचे हवाई आणि लष्करी तळांना लक्ष्य केले तर रशियाची कोंडी होऊ शकते.