File Photo
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे त्यात रंग भरत आहेत. निवडणुकीत चढ-उतार होत आहेत. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचारात राष्ट्रप्रेमाचा मुद्दा अधिक जोरदारपणे मांडल्याने गेल्या १० दिवसांत त्यांनी ७ महत्त्वाच्या राज्यांत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्याशी बरोबरी केली आहे.
पाच नोव्हेंबरला अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होत असून ट्रम्प यांना राष्ट्रवादी कार्डाने राजकीय फायदा मिळत असल्याचे दिसते. ट्रम्प यांनी प्रचारात राष्ट्रवादाचा मुद्दा अधिक आग्रहीपणाने मांडल्याने देशातील ७ सर्वात महत्त्वाच्या राज्यांपैकी (स्विंग स्टेट्स) ४ राज्यांमध्ये कमला हॅरिस यांची आघाडी कमी करत बरोबरी केली आहे.
विशेष म्हणजे, १० दिवसांपूर्वीपर्यंत ट्रम्प या ७ राज्यांत कमला हॅरिस यांच्या तुलनेत मागे होते. आता कमला हॅरिस यांना फक्त तीन राज्यांमध्ये आघाडी आहे. ट्रम्प यांनी मेक अमेरिका ग्रेट अगेन या मोहिमेला वेग दिला आहे. आपल्या प्रत्येक सभेत ट्रम्प राष्ट्रवादी मुद्दे मांडत आहेत. निवडणुकीत ही सात राज्ये उमेदवाराचे भवितव्य ठरवतात.
त्यातच ट्रम्प आणि हॅरिस यांच्यातील पहिली अध्यक्षीय चर्चा १० सप्टेंबरला एबीसी वृत्तवाहिनीवर होणार आहे. यातील दोन्ही उमेदवारांच्या प्रदर्शनानंतर अध्यक्षीय निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. या चर्चेनंतर दोघांमध्ये कोणतीही चर्चा होणार नाही. त्यामुळे ही चर्चा निर्णायक ठरणार आहे.
ट्रम्प आणि तत्कालीन डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायडेन यांच्यात जूनमध्ये अध्यक्षीय चर्चा झाली होती. त्यात बायडेन यांना आपला प्रभाव पाडता आला नव्हता. त्यामुळे बायडेन यांना रिंगणातून माघार घ्यावी लागली. ट्रम्प आता मोठ्या सभांवर भर देत आहेत. याआधी ट्रम्प लहान सभा घेत होते.
ट्रम्प यांना आपल्या फ्लोरिडा राज्यात मोठा पाठिंबा मिळाल्यानंतर ते संपूर्ण देशात येत्या ६० दिवसांत १२० मोठ्या सभा घेतील. या दरम्यान, ट्रम्प सतत कमला हॅरिस यांना कम्युनिस्ट संबोधत अमेरिकी मध्यमवर्गीयांना आपल्या बाजूने ओढत आहेत. ट्रम्प मध्यमवर्गावरील जास्त कर धोकादायक असल्याचा मुद्दा मांडत आहेत.
त्यात त्यांना यश येताना दिसत आहे. कमला हॅरिस आता स्वत:ला मध्यमवर्गीयांच्या हितकारक असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. पेन्सिल्व्हेनियाच्या सभेत कमला यांनी कर कपातीची मोठी घोषणा केली होती. कमला यांचे लक्ष अमेरिकेतील ६६ टक्के मध्यमवर्गीय मतदारांवर आहे. ट्रम्प यांची रणनीती कमला हॅरिस यांच्यावर वैयक्तिक हल्ले आणखी तीव्र करण्याची आहे. त्यांनी कमला यांना कृष्णवर्णीय असल्याच्या मुद्द्यावरून घेरले आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते ट्रम्प आता कमला हॅरिस यांच्यावर मोठा वैयक्तिक हल्ला करतील.