संग्रहित छायाचित्र
डाव्या विचारसरणीचे नेते अनुरा कुमार दिसानायके यांची श्रीलंकेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांनी समगी जन बलवेगया (एसजेबी) पक्षाचे नेते सजित प्रेमदासा यांचा पराभव केला आहे. डावी विचारसरणी आणि कट्टर भारतविरोधामुळे दिसानायके अध्यक्ष झाल्यावर भारत-श्रीलंका द्विपक्षीय संबंध कसे असतील याकडे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे.
दिसानायके हे मार्क्सवादी जनता विमुक्ती पेरामुना (जेव्हीपी) हा पक्ष सामील असलेल्या नॅशनल पीपल्स पॉवर (एनपीपी) आघाडीचे नेते आहेत. दिसानायके अध्यक्ष झाल्यानंतर आता भारत व श्रीलंका संबंधांबरोबर तमिळ जनतेबाबत त्यांची नेमकी काय भूमिका असेल याविषयी सर्वांना उत्कंठा लागून राहिलेली आहे.
श्रीलंका हे भारताच्या शेजारी राष्ट्रांमधील अत्यंत महत्त्वाचे राष्ट्र आहे. हिंदी महासागरातील चीनच्या हालचाली आणि भारतविरोधी कारवाया गेल्या काही काळात वाढल्या आहेत. या काळात भारताने श्रीलंकेबरोबरचे संबंध जपले आहेत. मात्र, श्रीलंकेत आता सत्तांतर झाल्यामुळे सरकारच्या भूमिकेत बदल घडू शकतो. नेपाळच्या बाबतीत भारताला असाच अनुभव आला आहे. श्रीलंकेचे नवे अध्यक्ष आणि त्यांच्या सत्ताधारी आघाडीची भारताबद्दल नेमकी काय भूमिका असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दिसानायके यांच्या जेव्हीपी पक्षाने अनेकदा भारतातून श्रीलंकेत गेलेल्या तमिळ वंशाच्या लोकांना विरोध केला आहे. तमिळी लोकांना जेव्हीपीने भारताचे विस्तारवादी साधन म्हटलं आहे. तसेच जेव्हीपीने भारत व श्रीलंकेतील व्यापारावरील सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराला (सीईपीए) नेहमी विरोध केला आहे. या करारामुळे उभय देशांमधील व्यापार वाढणार असून गुंतवणुकीलाही चालना मिळणार आहे.
श्रीलंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष दिसानायके यांनी कच्चातिवू बेट भारताला परत करण्याच्या प्रयत्नांना विरोध दर्शवला होता. कोणत्याही किमतीत कच्चातिवू बेट भारताला देऊ देणार नाही, असं त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. भारत सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला दिसानायके आणि जेव्हीपीच्या शिष्टमंडळाला अधिकृत भेटीसाठी भारतात निमंत्रित करण्यासाठी संपर्क केला होता. मात्र त्यांची भारताविषयीची भूमिका नकारात्मक होती.
अनुरा दिसानायके यांनी १९८७ मध्ये ‘एनपीपी’चा मातृपक्ष असलेल्या ‘जेव्हीपी’मध्ये प्रवेश केला. तेव्हापासून दिसानायके राजकारणात सक्रिय आहेत. त्यावेळी ‘जेव्हीपी’ भारतविरोधात अत्यंत आक्रमक होता. त्या पक्षाने १९८७ च्या राजीव गांधी आणि जे. आर. जयवर्धने यांच्यादरम्यान झालेल्या भारत-श्रीलंका कराराला विरोध दर्शवला होता. कराराला पाठिंबा देणाऱ्या सर्व लोकशाही पक्षांच्या कार्यकर्त्यांवर त्यांनी टीका केली होती. हा करार म्हणजे श्रीलंकेच्या सार्वभौमत्वावर घाला असल्याचा आरोप तेव्हा ‘जेव्हीपी’ने केला होता. मात्र, दिसानायके यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये भारताचा दौरा करून आपली भारताविषयीची भूमिका बदलल्याचे संकेत दिले होते.