संग्रहित छायाचित्र
गाझापट्टी: इस्राएली सैनिकांनी शनिवारी जेनिन, वेस्ट बँक येथे केलेल्या छापेमारीत जखमी पॅलेस्टिनीला वाहनाच्या समोर बांधून फिरवले. याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने यावर आता जोरदार टीका होता आहे. इस्राएली सैनिक काही पॅलेस्टिनींना पकडण्यासाठी वाडी बुर्किन भागात गेले होते.
या कारवाईवेळी लष्कर, पॅलेस्टिनींमध्ये गोळीबार झाला. यात एक जण जखमी झाला. त्याला जवानांनी त्या परिसरातून बाहेर काढले. त्यांनी त्याला जीपच्या पुढील बाजूला बांधले. त्यानंतर त्याला संयुक्त राष्ट्रांच्या रेड क्रिसेंटकडे सोपवण्यात आले. जखमी पॅलेस्टिनीचे नाव मुजाहिद आझमी आहे. इस्राएलच्या संरक्षण दलाने या प्रकरणाला दुजोरा दिला असून या घटनेच्या तपासाचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले की व्हीडीओमध्ये जे दिसत आहे ते आमच्या आदेशाच्या विरोधात आहे. त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल.
जखमी पॅलेस्टिनीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांनी इस्राएली लष्कराकडून रुग्णवाहिका मागवली होती. त्याऐवजी त्यांनी पॅलेस्टिनीला जीपच्या पुढील भागाला बांधले आणि पळ काढला. याआधी शनिवारी काही बंदूकधारींनी वेस्ट बँकेच्या कलकिल्या भागात एका इस्राएली नागरिकाची हत्या केली होती. यानंतर त्यांची कार पेटवून देण्यात आली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर इस्राएली सैनिक मोठ्या संख्येने तेथे पोहोचले. त्यांनी याला दहशतवादी हल्ला म्हटले. इस्राएली लष्कराने म्हटले होते की, त्यांच्या देशाच्या कोणत्याही नागरिकाला पॅलेस्टाईन प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली असलेल्या वेस्ट बँकमध्ये जाण्याची परवानगी नाही. तथापि, काही इस्राएली अजूनही स्वस्त भाज्या, धान्यांच्या शोधात वेस्ट बँकमध्ये जातात. हमासविरुद्ध युद्ध सुरू झाल्यापासून, इस्राएलने वेस्ट बँकमध्ये सातत्याने कारवाया केल्या आहेत. या काळात सुमारे ४८० पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. वेस्ट बँकमधील ऑपरेशन दरम्यान ६ सैनिकांसह १० इस्राएलींचाही मृत्यू झाला आहे. वेस्ट बँक व्यतिरिक्त, इस्राएली सैनिकांनी गाझामध्ये पॅलेस्टिनींवर अनेकदा अत्याचार केल्याचा आरोप आहे. मार्चमध्ये पॅलेस्टिनी महिलांच्या अंतर्वस्त्रांसह इस्राएली सैनिकांचे काही व्हीडीओ व्हायरल झाले होते. यामध्ये सैनिकाच्या एका हातात बंदूक आणि दुसऱ्या हातात महिलेची अंतर्वस्त्र होती.
Israel Palestine Conflict