संग्रहित छायाचित्र
बीजिंग: कधी कोणता ट्रेंड लोकप्रिय होईल हे सांगता येत नाही. सध्या काही देशात स्ट्रिट गर्लफ्रेंडचा ट्रेंड लोकप्रिय होतोय. काही लोकांना कोणत्याही बंधनाशिवाय प्रेम करायला आवडते, अशा लोकांना डोळ्यासमोर ठेवून ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे. चीनमध्ये सध्या हा अनोखा ट्रेंड चर्चेचा विषय ठरला आहे.
चीनमध्ये रस्त्याच्या कडेला काही तरुणी बसलेल्या दिसतात. त्यांच्यासमोर रेटकार्डही ठेवण्यात आलेली आहेत. या रेटकार्डमध्ये जोडीदाराबरोबर प्रेमाचे संवाद साधण्यापासून किसपर्यंतचे रेट्स देण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे ही सेवा ऑनलाईन आणि ऑफलाईनही उपलब्ध आहे. ज्या लोकांना प्रेमात धोका मिळाला आहे, किंवा कुटुंबात, नोकरीत समस्या आहेत, असे लोक आपल्या स्ट्रिट गर्लफ्रेंडसमोर मन मोकळे करू शकतात. पण त्यासाठी थोडे पैसे मोजावे लागतील. चीनमध्ये रेंटेड रिलेशनशिपची संकल्पना वाढली आहे. शेन्झेनसारख्या शहरांच्या रस्त्यांवर मुली रेट कार्ड घेऊन बसलेल्या दिसतात.
यात चुंबन घेणे, आलिंगन देणे आणि एकत्र चित्रपट पाहणे यासारख्या सेवा या मुली देतात. या प्रेमाच्या क्षणांची किंमत ११ रुपयांपासून ते ४५०० रुपयांपर्यंत आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार असे स्टॉल्स आता चीनमध्ये सामान्य गोष्ट झाली आहे. अशा अनेक स्टॉल्सचे फोटो आणि व्हीडीओ चीनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले आहेत. काही तरुणी पैसे कमवण्यासाठी या मार्गाकडे वळताना दिसत आहे. पण या ट्रेंडमध्ये शारीरिक संबंधांस मनाई आहे. आलिंगन देण्याचे ११ रुपये, एका किससाठी ११५ रुपये असे रेट ठरवण्यात आले आहेत. याशिवाय एकत्र चित्रपट पाहण्यासाठी १५० रुपये मोजावे लागणार आहेत.
तुम्हाला जर तुमच्याबरोबर घरात काम करण्यासाठी जोडीदार हवा असेल तर त्यासाठीही या मुली तयार असतात. यासाठी २००० रुपये किंमत आहे. या रेटकार्डमधील सर्वात महागडी सेवा म्हणजे एकत्र मद्यपान करणे. मद्यपान करण्यासाठी तुम्हाला महिला जोडीदार हवी असेल तर तुम्हाला ४२०० रुपये द्यावे लागतील. या अनोख्या ट्रेंडवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. काही या संकल्पनेचे कौतुक केले आहे, तर तर काहींनी हा महिलांचा अपमान असल्याचे म्हटले आहे.