संग्रहित छायाचित्र
माले: मालदीवची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी मदत केल्याबद्दल मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी भारताचे आभार मानले आहेत. मालदीवच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला संबोधित करताना ते म्हणाले की, भारत, चीन यांनी मालदीवचे कर्ज फेडण्यासाठी खूप मदत केली आहे. मुइज्जू चीनसमर्थक मानले जातात. त्यांच्या भूमिकेमुळे द्विपक्षीय संबंध ताणले गेले होते. त्यांनी जाहीरपणे भारताचे आभार मानणे ही महत्त्वाची बाब मानता येईल.
भारताशी लवकरच मजबूत संबंध निर्माण होतील आणि मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी होईल, अशी आशा मुइज्जू यांनी व्यक्त केली. भारताने 'नेबर फर्स्ट पॉलिसी' अंतर्गत मालदीवला ४०० कोटी मदत केली आहे. मालदीवने कृतज्ञता व्यक्त करताना कर्जाची परतफेड सुलभ करण्यासाठी भारत मदत करेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने मालदीवला इशारा दिला होता की, जर त्यानी आपल्या आर्थिक धोरणात बदल केले नाहीत तर त्याला कर्जाबाबत समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
याआधी शुक्रवारी मुइज्जू यांनी चीनने पाच वर्षांपर्यंत कर्ज परतफेडीतून दिलासा दिल्याचे सांगितले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मालदीवमध्ये 'इंडिया आऊट' मोहीम राबवणारे मोहम्मद मुइज्जू सत्तेवर आल्यापासून दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. यामुळे मालदीवच्या पर्यटन क्षेत्राला फटका बसत आहे. जानेवारी २०२४ मध्ये पंतप्रधान मोदींवर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीनंतर मालदीवला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.
दोन्ही देशांमधील तणाव दूर करण्यासाठी मालदीवचे पर्यटनमंत्री इब्राहिम फैसल भारत दौऱ्यावर येत आहेत. भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ते नवी दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू सारख्या मोठ्या शहरांमध्ये रोड शो करणार आहेत. या काळात लोकांना मालदीवमध्ये जास्तीत जास्त संख्येने येण्याचे आवाहनही करण्यात येणार आहे. मालदीवला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या झपाट्याने कमी होत असताना फैसल भारतात येत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जानेवारी ते एप्रिल दरम्यान मालदीवला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत ४२ टक्क्यांनी घट झाली आहे. २०२३ च्या पहिल्या चार महिन्यांत सर्वाधिक भारतीय पर्यटक चीनमध्ये गेले.
चीनमधील पर्यटक या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. जानेवारी २०२४ मध्ये केवळ १५ हजार ३ भारतीय मालदीवमध्ये पोहोचले होते. जानेवारी २०२३ मध्ये हा आकडा १८ हजार १६२ होता.वृत्तसंंस्था