संग्रहित छायाचित्र
ट्रम्प यांच्यावरील हल्ला झाला असला तरी यापूर्वीही अमेरिकेत माथेफिरूंकडून राजकीय नेत्यांना लक्ष्य करण्याचे प्रकार घडले आहेत. अब्राहम लिंकन यांच्यासह चार अध्यक्षांची हत्या, तर तीन अध्यक्षांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आले. १७७६ मध्ये देशाच्या स्थापनेपासून आतापर्यंत या घटना घडल्या आहेत.
अमेरिकेतील राजकीय हिंसाचाराला बळी ठरलेले पहिले राष्ट्राध्यक्ष होते अब्राहम लिंकन. जगाला लोकशाहीची व्याख्या समजावणाऱ्या आणि कृष्णवर्णीयांच्या हक्कासाठी आजीवन लढा देणाऱ्या या महान नेत्याची १८६५ मध्ये हत्या करण्यात आली. रिपब्लिकन पक्षाचे पहिले अध्यक्ष असलेले लिंकन हे अमेरिकी गृहयुद्धाच्या काळात पदावर होते. लिंकन यांनी गुलामगिरी पद्धतीला तीव्र विरोध केला होता.
१४ एप्रिल १८६५ रोजी वॉशिंग्टन डीसी येथील फोर्ड्स नाट्यगृहात ‘अवर अमेरिकन कझिन’ नावाचे विनोदी नाटक पाहण्यास लिंकन पत्नीसह गेले होते. तेव्हा गॅलरीत मागील बाजूने जॉन विल्क्स बूथ नावाच्या अभिनेत्याने प्रवेश केला. त्याच्या खिशात डेरिंजर नावाचे पिस्तूल होते. बूथने अचानक लिंकन यांच्या कानामागून त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. लिंकन यांना वैद्यकीय उपचारासाठी नाट्यगृहापासून रस्त्याच्या पलीकडील एका घरात नेण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. या हत्येनंतर बूथ पळून जाण्यात यशस्वी ठरला. त्यानंतर १२ दिवसांनी व्हर्जिनियातील बॉलिंग ग्रीनजवळील एका गोठ्यात लपून बसलेल्या बूथचा पोलिसांनी माग काढला आणि त्याला ठार केले.
अमेरिकेचे २० वे अध्यक्ष जेम्स गारफिल्ड यांचीही हत्या करण्यात आली. पदभार स्वीकारल्यानंतर सहा महिन्यांतच गारफिल्ड यांना ठार मारण्यात आले. २ जुलै १८८१ मध्ये न्यू इंग्लंडला जाणारी ट्रेन पकडण्यासाठी ते वॉशिंग्टनमधील रेल्वे स्थानकातून जात असताना चार्ल्स गुइटो नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. अलेक्झांडर ग्रॅहम बेल या दूरध्वनी शोधकाने राष्ट्राध्यक्षांसाठी खास डिझाइन केलेल्या उपकरणाचा वापर करून गारफिल्डच्या छातीत अडकलेली गोळी शोधण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. गंभीर जखमी झालेले गारफिल्ड कित्येक दिवस व्हाइट हाऊसमध्ये अंथरुणावर पडून होते. अखेर अडीच महिन्यांनी त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणात दोषी आढळलेल्या गुइटोला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. विल्यम मॅककिन्ली यांचीही १९०१ मध्ये हत्या करण्यात आली. न्यूयॉर्कमध्ये बफेलो येथे भाषण केल्यानंतर जमलेल्या नागरिकांशी हात मिळवत असताना एका व्यक्तीने त्यांच्या छातीवर गोळ्या झाडल्या. डॉक्टरांनी मॅककिन्ली बरे होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र गोळ्यांच्या जखमांमुळे गँगरिन झाल्याने मॅककिन्ली यांचा मृत्यू झाला.
लिओन क्झोल्गोझ नावाच्या बेरोजगार तरुणाने हत्येची कबुली दिली. दोषी ठरल्यानंतर क्झोल्गोझला विजेच्या खुर्चीत ठार मारण्यात आले. जॉन एफ. केनेडी यांची १९६३ मध्ये डॅलस शहरात हत्या करण्यात आली. खुल्या लिमोझिन गाडीतून जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. ली हार्वे ओस्वाल्ड याच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला. खटल्याची सुनावणी होण्यापूर्वीच जॅक रुबी नावाच्या हल्लेखोराने गोळ्या झाडून ओस्वाल्डची हत्या केली. १९६८ मध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभ्या असलेल्या डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार रॉबर्ट एफ. केनेडी यांचीही हत्या करण्यात आली. पाच वर्षांपूर्वी हत्या केलेले राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांचे बंधू होते.
१९७४ ते १९७७ या काळात अध्यक्षपदी असणाऱ्या जेराल्ड रुडॉल्फ फोर्ड यांच्या हत्येचा दोन वेळा प्रयत्न झाला होता. दोन्ही घटनांमध्ये फोर्ड यांना इजाही झाली नाही. अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्याही हत्येचा प्रयत्न करण्यात आला होता. वॉशिंग्टन डी. सी. येथे गर्दीत असलेल्या जॉन हिंकले याने गोळी झाडली. या गोळीबारात रेगन बचावले.