संग्रहित छायाचित्र
इस्लामाबाद : बांगलादेशातील स्थितीची पाकिस्तानची तुलना केल्याबद्दल पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर भडकले आहेत. देशात अराजकता निर्माण करणाऱ्यांना त्यांनी कडक इशारा दिला असून ते म्हणाले, देशात संकट निर्माण करणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे. लष्कर असा कोणताही प्रयत्न हाणून पाडेल आणि राष्ट्राचे रक्षण करेल.
सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये पाकिस्तानच्या परिस्थितीची तुलना बांगलादेशाशी करण्यात आली आहे. त्यानंतर लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी वरील वक्तव्य केले आहे.
इस्लामाबादमधील राष्ट्रीय उलेमा अधिवेशनात मुनीर म्हणाले की, जर कोणी पाकिस्तानमध्ये अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत असेल तर मी अल्लाहची शपथ घेऊन सांगतो की, आम्ही त्यांच्याशी लढू. पाकिस्तानी लष्कर अशांतता आणि अराजकता दूर करण्यात यशस्वी होईल.
मुनीर यांनी अप्रत्यक्षपणे भारतावर ताशेरे ओढले आहेत. ते म्हणाले, ज्यांनी बंगालच्या उपसागरात द्विराष्ट्र सिद्धांत बुडवला असे लोक सध्या कोठे आहेत, असा प्रश्न मला पडला आहे. जगातील कोणतीही शक्ती पाकिस्तानचे नुकसान करू शकत नाही. पाकिस्तानची उभारणी एक देश म्हणून कायमस्वरूपी टिकू राहण्यासाठी झालेली आहे. देश किती महत्त्वाचा आहे हे जाणून घ्यायचे असेल तर इराक, सीरिया आणि लिबियाकडे बघा. पाकिस्तानचे अस्तित्व कायम राहील, कारण ते टिकण्यासाठी निर्माण झाले आहे. लाखो असीम मुनीर, लाखो नेते आणि लाखो विद्वानांनी या पाकिस्तानसाठी बलिदान दिले आहे. कारण, कोणाहीपेक्षा देश महत्त्वाचा आहे.
लष्करप्रमुखांनी देशातील गोंधळासाठी सोशल मीडियाला जबाबदार धरले. ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांत सोशल मीडियावर लष्करला अधिक लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे देशाची राजकीय आणि सामाजिक जडणघडण बिघडत आहे. असे प्रयत्न करणाऱ्यांना अटक करून कायदेशीर कारवाई केली जाईल. भ्रष्टाचार हे एक महत्त्वाचे कारण असून अल्लाहच्या दृष्टीने हा सर्वात मोठा गुन्हा आहे. पाकिस्तानी लष्कर देशातून भ्रष्टाचार संपवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. शरियत आणि संविधान जे मानत नाही त्यांना मी पाकिस्तानी मानत नाही. मुनीर यांनी भाषणात काश्मीर प्रश्नावर चर्चा केली. त्यांनी काश्मीर हा भारत-पाकिस्तानचा अपूर्ण अजेंडा असल्याचे वर्णन केले. गाझामध्ये सुरू असलेल्या अत्याचाराबाबतही त्यांनी दुःख व्यक्त केले.