संग्रहित छायाचित्र
कोव्हिशिल्ड (covishield) लशीचे दुष्परिणाम समोर आल्याने जगभरात काळजीचे वातावरण पसरले आहे. त्यात कोव्हिशिल्ड लस बनवणाऱ्या अॅस्ट्राजेनेका (AstraZeneca) या कंपनीकडून जगभरातून कोविड १९ ची लस मागे घेण्यास सुरुवात केली असून व्यावसायिक कारणास्तव ही लस बाजारातून मागे घेत असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. याआधी कोव्हिशिल्ड लशीचे दुष्परिणाम होवू शकतात असे कागदपत्रांतून कंपनीने न्यायालयासोर मान्य केले होते. लशीमुळे टीटीएस म्हणजेच थ्रोम्बोसिस थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम हा आजार होऊ शकतो. या आजारात शरीरात रक्ताच्या गुठळ्या आणि प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यामुळे अनेकांचा मृत्यू होऊ शकतो, असे अॅस्ट्राजेनेका कंपनीने म्हटले होते. (covishield side effects) त्यानंतर व्यावसायिक कारणामुळे यापुढे लशीची निर्मिती अथवा विक्री केली जाणार नाही असे कंपनीने आता जाहीर केल्याचे वृत्त टेलिग्राफने दिले आहे.
अॅस्ट्राजेनेका कंपनीने कोविड-१९ साठी Vaxzevria ही लस निर्माण केली होती. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने देखील ही लस उत्पादित केली होती जी भारतात Covishield या नावाने विकली गेली.
वकील विशाल तिवारी यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून कोव्हिशील्ड लस घेतल्यानंतर शरीरावर कोणते दुष्परिणाम होतात, ही लस घेणे किती धोक्याचे आहे, लशीतील कोणते घटक मृत्यूसाठी कारणीभूत ठरत आहेत याची संपूर्ण तपासणी करण्यात यावी. हा तपासणी अहवाल सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीसमोर सादर करण्यात यावा. तसेच ही लस घेतल्यामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणीही याचिकेद्वारे करण्यात आली आहे.