संग्रहित छायाचित्र
वॉशिंग्टन: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीला आता केवळ १० दिवस उरले आहेत. येत्या ५ नोव्हेंबरला होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी संपूर्ण हॉलिवूड चित्रपटसृष्टीच प्रचारात उतरली आहे की काय अशी परिस्थिती आहे. कमला हॅरिसना पाठिंबा देणारे टेलर स्विफ्ट, लिओनार्डो डिकॅप्रियो, ओप्रा विन्फ्रे, बियॉन्से आणि ख्रिस रॉक या सेलिब्रिटींनी कंबर कसली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार कार्यात जेसन एल्डियन, ली ग्रीनवूड, किड रॉक आणि रोझेन बार यांसारखे स्टार्स ट्रम्प यांच्यासाठी प्रचारकार्यात जमिनीवर उतरले आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे.
रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस या निवडणुकीत मतदारांना आपल्या बाजूने करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. आता दोन्ही बाजूंनी हॉलिवूड चित्रपटसृष्टीतील स्टार्सनी आपल्या पसंतीच्या उमेदवाराचा दावा बळकट करण्यासाठी निवडणूक प्रचारात उतरले आहेत.
हॉलिवूड सेलिब्रिटींनी या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात आपल्या आवडत्या उमेदवारांना उघडपणे पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. सुप्रसिद्ध क्रीडाक्षेत्रातील खेळाडू तसेच अब्जाधीश एलॉन मस्क यासारख्या सेलिब्रिटीदेखील मागे नाहीत. फोर्ब्सने दिलल्या अहवालानुसार, क्रीडा आणि चित्रपट कलाकारांना आशा आहे की, अशाप्रकारे राजकारण्यांना पाठिंबा दिल्याने त्यांच्या चाहत्यांवर त्याचा प्रभाव पडेल आणि ते निवडणुकीच्या निकालांवर प्रभाव टाकू शकतील.
निवडणूक रॅलींपासून ते सोशल मीडियावर घमासान
शुक्रवारी ऑस्कर विजेता अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रिओनेही कमलांना पाठिंबा देत सोशल मीडियावर एक व्हीडीओ पोस्ट केला. अध्यक्षपदासाठी कमला हॅरिस यांना मतदान करणार असल्याचे त्यांनी व्हीडीओमध्ये म्हटले आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हीडीओमध्ये डिकॅप्रिओ म्हणाला, "हवामानातील बदलामुळे पृथ्वी नष्ट होत आहे आणि आपली अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होत आहे. म्हणूनच मी कमला हॅरिसला मतदान करत आहे."
शुक्रवारी, पॉप स्टार बियॉन्से देखील कमला हॅरिससह निवडणूक रॅलीत सहभागी झाली होती. ही रॅली बेयॉन्सेच्या होम टाऊन ह्यूस्टनमध्ये आयोजित करण्यात आली होती. बियॉन्सेने कमलाचे समर्थन केले आणि सांगितले की, ती येथे सेलिब्रिटी म्हणून नाही तर ती एक आई आहे म्हणून उपस्थित आहे. आपल्या शरीरावर आपले नियंत्रण असले पाहिजे. बियॉन्से गर्भपात कायद्याचा संदर्भ देत होती.
ट्रम्प यांच्या समर्थनार्थ अनेक स्टार्सनी निवडणूक रॅलींमध्येही सहभाग घेतला आहे. उद्योगपती एलॉन मस्कही एका रॅलीत ट्रम्प यांच्यासोबत स्टेजवर नाचताना दिसले. ट्रम्प यांच्या समर्थनार्थ लवकर मतदान करणाऱ्या मतदारांना मस्क यांनी ८ कोटी रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे. मस्क यांच्या व्यतिरिक्त ली ग्रीनवूड, डेनिस क्वेड, जेसन एल्डियन यांनीही ट्रम्प यांच्यासोबत अनेक रॅलींना हजेरी लावली आहे.
ही काही पहिलीच वेळ नाही
अमेरिकेच्या राजकारणात चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रातील स्टार्सनी निवडणूक प्रचारात भाग घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. अमेरिकेत मॅककार्थीचे सरकार पडल्यानंतर, जोसेफ केनेडी यांना कोणत्याही चित्रपट स्टारइतक्याच धूमधडाक्यात लाँच करण्यात आले. केनेडींच्या समर्थनार्थ हॉलिवूड एका बाजूला उभे असल्याचे दिसत होते. केनेडींच्या समर्थन रॅलीमध्ये अनेक पॉप स्टार सहभागी झाले होते. केनेडींसाठी हॉलिवूडनेही मोठा निधी उभा केला.