File Photo
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार आणि सध्याच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांच्यात चुरशीची लढत होत आहे. सध्याचे अध्यक्ष जो बायडेन यांनी माघार घेतल्यानंतर हॅरिस यांनी मतदारांवर चांगला प्रभाव टाकल्याचे दिसून येत असल्याने निवडणूकपूर्व सर्वेक्षणात त्यांनी आघाडी घेतली आहे.
काही दिवसांपूर्वी माजी अध्यक्ष ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. यानंतर आता ॲरिझोना येथे कमला हॅरिस यांच्या प्रचार कार्यालयात गोळीबार झाला आहे. या घटनेला पोलिसांनी दुजोरा दिला असून मध्यरात्रीनंतर अज्ञातांनी गोळीबार केला. त्यावेळी तेथे कोणीही नव्हतं. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अमेरिकचे मतदार आपला पुढील अध्यक्ष निवडण्यासाठी ५ नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान करणार आहेत. महासत्ता मानल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे.सध्या अमेरिकेत प्रशासकीय अधिकारी हे निवडणूक कर्मचाऱ्यांची सुरक्षा, मतदानासंदर्भातील प्रक्रियेची सुरक्षा निश्चित करण्यासाठी उपाययोजना करत आहेत. त्यातच अमेरिकेत राजकीय हिंसाचार वाढत असल्याच्या काही घटना समोर येत आहेत.
हॅरिस यांच्या प्रचार कार्यालयावर हल्ला झाल्याच्या घटनेला पोलिसांनी दुजोरा दिला असून मध्यरात्रीनंतर अज्ञातांनी गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ज्यावेळी कार्यालयात गोळीबार झाला, त्यावेळी त्या ठिकाणी कोणीही नव्हतं. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेनंतर आता कमला हॅरिस यांच्या प्रचार कार्यालयात काम करणाऱ्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या घटनेनंतर तपास यंत्रणा घटनास्थळी जाऊन घटनेचा तपास करत आहेत. तसेच त्या परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त पावले उचलली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गोळीबार घडल्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. कार्यालयाच्या खिडक्यांमधून गोळ्या झाडल्या गेल्या. दरम्यान, या कार्यालयात अशी घटना दुसऱ्यांदा घडली असल्याचंही सांगितलं जात आहे. पोलिसांनी सांगितले की, समोरच्या खिडक्यांवर पेलेट गनने गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र, पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे.
माजी अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही दोन वेळा हल्ला झाला आहे. हल्ल्यानंतर एका व्यक्तीला तातडीने अटक करण्यात आली होती. त्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पेनसिल्व्हेनियामध्ये एका रॅलीदरम्यान गोळीबार करण्यात आला होता. यातून ते थोडक्यात बचावले होते.