File Photo
रियाध : धार्मिक तीर्थयात्रेच्या नावाखाली पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणावर नागरिक सौदी अरेबियामध्ये येत असतात. मात्र, या वाढत्या संख्येवरून सौदीने पाकिस्तानला इशारावजा धमकी दिली असून हे नागरिक धार्मिक यात्रेच्या नावाखाली येतात आणि नंतर भीक मागतात, असे सौदीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. पाकिस्तानने अशा नागरिकांना थांबवण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचे आवाहन सौदीने केले आहे. असे झाले नाही तर पाकिस्तानी उमराह आणि हज यात्रेकरूंवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो असा इशाराही सौदी अरेबियाने दिला आहे.
सौदी अरेबियाने इशारा दिल्यानंतर उमरा प्रवास करणाऱ्या ट्रॅव्हल एजन्सींचे नियमन करण्यासाठी उमरा कायदा आणण्याची योजना असल्याची माहिती पाकिस्तानने देण्यात आली आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी सौदीचे राजदूत नवाफ बिन सईद अहमद अल-मल्की यांना असे आश्वासन दिले आहे की, यासंदर्भात कठोर उपाययोजना अंमलात आणले जातील.
दरम्यान, फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचे पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी म्हटलं आहे. गेल्या वर्षी पाकिस्तानचे गृहसचिव अर्शद महमूद यांनी असे म्हटले होते की, अनेक आखाती देशांनी काही पाकिस्तानी नागरिकांच्या वर्तनाबद्दल, विशेषत: कामाबाबतची नैतिकता, वृत्ती आणि गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागाबद्दल चिंता व्यक्त केली होती. तसेच सौदीच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या माहितीनुसार, परदेशात पकडले गेलेले ९० टक्के भिकारी पाकिस्तानचे आहेत. अनेकदा भिकाऱ्यांशी संबंधित टोळ्याही पकडल्या गेल्या आहेत.
भिकाऱ्यांमुळे सौदी त्रस्त
धार्मिक तीर्थयात्रेच्या नावाखाली पाकिस्तानी नागरिक सौदी अरेबियातील विविध शहरात येतात आणि नंतर भीक मागतात. अशा लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सौदी अरेबियाने याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यासंदर्भात पाकिस्तानला इशारावजा धमकी सौदी अरेबियाने दिली आहे. पाकिस्तानी भिकाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे सौदी अरेबिया त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे.