संग्रहित छायाचित्र
मॉस्को : रशियाने युक्रेनमधील मुलांच्या रुग्णालयावर हवाई हल्ला केला असून त्यात ४१ जणांचा मृत्यू झाला असून १७० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अमेरिकच्या ‘सीएनएन’ ने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी कीवमध्ये हा हल्ला झाला. यानंतर ६०० हून अधिक रुग्णांना रुग्णालयातून दुसरीकडे हलवण्यात आले.
हल्ल्यानंतर काही वेळातच रुग्णालयाची इमारत कोसळली. पोलिसांनी सांगितले की, ३ मुलांचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित जखमींवर उपचार सुरू आहेत.
राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की, रुग्णालयात गर्दी असताना हा हल्ला करण्यात आला. झेलेन्स्की यांनी प्रत्युत्तर देण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली.बचाव पथक आणि स्थानिक लोक ढिगारा हटवून लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकांनी दिलेल्या माहितीनुसार अजूनही अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. हा हल्ला इतका मोठा होता की जवळपासच्या १०० हून अधिक इमारतींचे नुकसान झाले.युक्रेनच्या हवाई दलाने सांगितले की त्यांनी ३८ पैकी ३० रशियन क्षेपणास्त्रे पाडली आहेत. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला होता. या हल्ल्यांमध्ये डनिप्रो, क्रिव्ही रिह, स्लोव्हियान्स्क आणि क्रॅमतोर्स्क या शहरांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
रशियाने गेल्या काही दिवसांत युक्रेनवर ५५ हवाई हल्ले केले होते.रशियन सैन्याने शुक्रवारी युक्रेनमधील वेगवेगळ्या ठिकाणी ६ रॉकेट आणि ७० पेक्षा जास्त ग्लाईड बॉम्बने हल्ले केले. रशियन सैन्य रात्रभर अधूनमधून हल्ले करत आहेत. त्यांनी उत्तर युक्रेनमधील पॉवर प्लांटवर हल्ला केला. त्यामुळे 1 लाखाहून अधिक लोकांना वीजेविना अंधारात राहवे लागत आहे.
संपूर्ण परिसरात असे हल्ले काही दिवस सुरू राहतील, असा इशारा युक्रेनच्या लष्कराने दिला आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाने सांगितले की त्यांनी पूर्व युक्रेनमधील ३० किलोमीटरचा भाग ताब्यात घेतला आहे. युक्रेनच्या सैन्याने रशियाला चशिव यार ताब्यात घ्यायचे असल्याचे सांगितले.