संग्रहित छायाचित्र
युक्रेनने रशियाच्या सीमा भागात केलेल्या आक्रमणाला उत्तर देताना रशियाने युक्रेनची राजधानी असलेल्या किव्ह शहरावर क्षेपणास्र हल्ला चढवला आहे. किव्हमध्ये अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अपार्टमेंट ब्लॉकचे हल्ल्यात नुकसान झाले आहे. रशियाने युक्रेनच्या पश्चिमेकडील आणि पोलिश सीमेजवळील प्रदेशांनाही लक्ष्य केले आहे.
युक्रेनला गेल्या काही काळापासून रशियाच्या हल्ल्याची प्रतीक्षा होती. अमेरिकेच्या दूतावासाने गेल्या आठवड्यात युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनाच्या आसपास हल्ला होईल असा इशारा दिला होता. रशियाने सोमवारी दोन वेळा ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झाली नाही. युक्रेनच्या सैन्याने दिलेल्या माहितीनुसार पहाटे २.३० च्या सुमारास राजधानीच्या आजूबाजूच्या प्रदेशात १० ड्रोन नष्ट करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी रशियाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
रशिया आणि युक्रेनने एकमेकांच्या नागरिकांना लक्ष्य केल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. युक्रेन युद्ध संपण्याची कोणतीही चिन्हे सध्या दृष्टिपथात नाहीत. त्यातच अचानक युक्रेनच्या एका धाडसी कृतीमुळे युद्धाच्या स्थितीला नवीन वळण लागले आहे. खरे तर रशियाने युक्रेनच्या अनेक प्रांतांमध्ये घुसखोरी केली. रशियन लष्कराला देशाबाहेर काढण्यासाठी युक्रेनने जिवाचे रान केले. युद्ध सुरू झाल्यानंतर प्रथमच युक्रेनने रशियाच्या कुर्स्क प्रांतात मुसंडी मारली. रशियाचीच सीमा ओलांडून युक्रेनने रशियाला अनपेक्षितपणे कोंडीत पकडले. याला रशिया उत्तर देणार अशी अपेक्षा होती. तरीही रशियाने शत्रूला बेसावध गाठण्यासाठी काही काळ प्रतीक्षा केली. त्यानंतरच त्यांनी किव्हवर क्षेपणास्त्र हल्ला केला.
रशियात आणीबाणी
युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या कुर्स्क या रशियन प्रांतात ७ ऑगस्ट रोजी युक्रेनच्या सैन्याने चिलखती तुकड्यांसह मुसंडी मारली. या फौजा आणि तुकड्यांनी युक्रेनमधील सुमी शहरातून कूच करत रशियाची सीमा ओलांडून जवळपास ३० किलोमीटर आत सुझा शहराजवळ पोहोचल्या. १० ऑगस्टपर्यंत कुर्स्क प्रांतातून ७६ हजार नागरिकांनी पलायन केले आणि रशियाच्या सरकारला तेथे आणीबाणी जाहीर करावी लागली. जवळपास २८ शहरे आणि गावे युक्रेनच्या ताब्यात गेल्याची माहिती कुर्स्कच्या राज्यपाालांनी दिली आहे.