न्यूयॉर्क: रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकी संशोधकांनी एक हादरवून टाकणारी बाबा समोर आणली आहे. रशियाने अण्विक हल्ल्यासंदर्भातील पूर्ण तयारी केली असल्याचा पुरावाच जणू अमेरिकेच्या हाती लागला आहे. रशियामधील '९ एम ७३० बुरेव्हेस्टनिक' या ठिकाणाचे काही सॅटेलाइट फोटो समोर आले आहेत. ही तीच जागा आहे जिथे रशियाने अण्विक क्षेपणास्त्र सज्ज ठेवली आहेत.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अभेद्य असा उल्लेख करत ज्या क्षेपणास्त्रांचा संदर्भ दिलेला आहे, ती हीच असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. पुतिन यांनी या शस्त्रांबद्दल बोलताना दिलेल्या माहितीच्या आधारे नाटोने या शस्त्रांची नावे एसएससी-एक्स 9 स्कायफॉल असल्याचे म्हटले आहे. पुतिन यांच्या दाव्यानुसार या क्षेपणास्त्राची क्षमता अमर्यादित आहे.
हे क्षेपणास्त्र अगदी अमेरिकेचे सुरक्षा कवचही भेदू शकते, असा पुतिन यांचा दावा आहे. मात्र पाश्चिमात्य देशांच्या तज्ज्ञांनी पुतिन यांच्या या दाव्यासंदर्भात शंका उपस्थित केली आहे. बुरेव्हेस्टनिकसारख्या शस्त्रसज्ज ठिकाण्यांमुळे रशियाच्या समर्थ्यामध्ये वाढ झाली आहे, असे म्हणणे घाईचे ठरेल. मॉस्कोकडे यापूर्वीही अशी शस्त्रे होती. उलट ही शस्त्रे हाताळताना किर्णोत्सर्ग होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
अमेरिकेच्या पॅनेट लॅबने २६ जुलै रोजी क्लिक केलेल्या फोटोंमध्ये, अण्विक शस्त्र ठेवण्यासाठी आवश्यक असे ठिकाण उभारण्यात आल्याचे दिसून आले आहे. कमर्शिअल सॅटेलाइट कंपनी असलेल्या पॅनेट लॅबच्या या फोटोंमध्ये दिसत असलेल्या दोन ठिकाणांची नावे व्होलोगाडा-२० आणि चेबसारा अशी आहेत. या ठिकाणी अण्विक क्षेपणास्त्र म्हणजेच न्युक्लिअर मिसाईल्स तैनात करण्यात आले आहेत. हे ठिकाण मॉस्कोपासून ४७५ किलोमीटवर असल्याचे समोर आले आहे.
या फोटोवरुन असे दिसून येत आहे की या ठिकाणी ९ लॉन्चपॅडचे बांधकाम केले जात आहे. तीन तीनच्या गटाने हे ९ लॉन्चपॅड उभारण्यात येत आहेत. एखाद्या लॉन्चपॅडवर चुकून अपघात झाला तर त्याचा परिणाम इतर लॉन्चपॅडवर होऊ नये असा विचार करुन या लॉन्चपॅडची रचना करण्यात आली आहे. हे सर्व लॉन्चपॅड रस्त्यांनी जोडलेले आहेत.
या ठिकाणी पाच अण्विक शस्त्र ठेवता येतील असे पाच बंकर्सही उभारण्यात आले आहेत. यासंदर्भात रॉयटर्सने रशिया आणि अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना कोणीही प्रतिसाद दिला नाही, असेही रॉयटर्सने म्हटले आहे.