अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे
काठमांडू: नेपाळमधील मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनमधील मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी मृतांचा आकडा १७० वर पोहोचला असून ५० जण अद्यापही बेपत्ता आहेत. नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. शुक्रवारी (२७ सप्टेंबर) पूर्व आणि मध्य नेपाळमधील अनेक भागात पाणी साचले होते. यामुळे देशातील अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत १७० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिल्या माहितीनुसार, पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत ५० जण बेपत्ता झाले आहेत. गृह मंत्रालयाचे प्रवक्ता ऋषिराम पोखरेल यांनी सांगितले की, पुरासंबंधित घटनांमध्ये ११९ जण जखमी झाले आहेत. पोखरेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा यंत्रणांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. नेपाळी सैन्याने देशभरातील अडकलेल्या १७७ लोकांना हवाई मार्गाने बाहेर काढले आहे.
पोखरेल यांनी सांगितले की, पूर आणि ठिकठिकाणी पाणी साचल्याने तब्बल चार हजार लोकांना नेपाळी सैन्य, नेपाळ पोलीस आणि सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांनी वाचवले आहे. त्यांना खाण्या-पिण्याच्या गोष्टींसह सर्व आवश्यक साहित्य पुरवण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरामुळे नेपाळमधील कमीत कमी ३५५ घरे आणि १८ पूल उद्ध्वस्त झाले आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी (२८ सप्टेंबर) काठमांडूच्या सीमेलगतच्या धादिंग जिल्ह्यात भूस्खलनामुळे बस गाडली गेल्याने कमीत कमी २० जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत वैज्ञानिकांनी सांगितले की, हवामान बदलामुळे संपूर्ण आशियात पावसामुळे मोठे बदल पाहायला मिळत आहेत. मात्र शहरामधील अनियोजित बांधकामांमुळे पूरपरिस्थिती उद्भवल्याचे सांगितले जात आहे.
मागच्या ४५ वर्षांतील सर्वाधिक विनाशकारी महापूर
गेल्या ४० ते ४५ वर्षांत काठमांडू घाटीत पावसाचा असा प्रकोप पाहायला मिळाला नाही. इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटेन डेव्हलपमेंट संस्थेच्या जलवायू आणि पर्यावरण विशेषज्ञ अरुण भक्त श्रेष्ठ यांनी सांगितले की, जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल या दोन गोष्टींनी हा प्रकार घडतो आहे. बागमती नदीने धोक्याची पातळी ओलांडली आणि हा प्रकोप अनुभवायला मिळत आहे.