संग्रहित छायाचित्र
जाकार्ता : पोप फ्रान्सिस सध्या इंडोनेशिया भेटीवर असून त्यांनी येथील कुटुंबव्यवस्थेचे कौतुक केले आहे. इंडोनेशियातील प्रत्येक घरात ३ ते ५ मुले असून हे इतर देशासाठी चांगले उदाहरण असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. जे लोक कुत्री आणि मांजरी पाळणे चांगले मानतात त्यांच्यासाठी हे उत्तम उदाहरण असून इंडोनेशियाने ही परंपरा कायम राखावी असे मतही त्यांनी व्यक्त केले.
पोप फ्रान्सिस यांच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवली जात आहे. एक यूजर म्हणतो, काही लोक मानवी सभ्यतेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी त्यांच्या खिशांना महत्त्व देत आहेत. शेवटी, कुत्रे मोठे झाल्यावर त्यांना त्यांच्या शिक्षणाची फी भरावी लागत नाही. अन्य एकजण म्हणतो, इंडोनेशियाचे भविष्य पोप यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त धोक्यात आहे, कारण येथील जन्मदर सतत घसरत आहे. काही वर्षांनी इंडोनेशिया जपानसारखा होईल.
२०२२ च्या आकडेवारीनुसार, इंडोनेशियाची एकूण लोकसंख्या २७ कोटी ५५ लाख आहे. येथे प्रत्येक स्त्री सरासरी २ मुलांना जन्म देते. तथापि, जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार इंडोनेशियाचा जन्मदर १९६० पासून निम्मा झाला आहे.
पोप यापूर्वीही त्यांच्या विधानांमुळे वादात सापडले होते. पोप यांनी एका बंदिस्त बैठकीत समलैंगिक पुरुषांबद्दल अपमानजनक टिप्पणी केली. समलैंगिक लोक जास्त कामुक असतात असे ते म्हणाले होते. या विधानावर टीका झाल्याने त्यांनी माफीही मागितली.
हल्ली घरांमध्ये कमी मुले असतात. मात्र, कुत्री आणि मांजरांची संख्या अधिक असते, याविषयी त्यांनी अलीकडे रोममधील परिषदेत आपले मत व्यक्त केले होते. ते म्हणाले, आजकाल घरांमध्ये उदास वातावरण असते. ही घरे सामानांनी भरलेली आहेत. घरात मुले-मुली नाहीत. तेथे हास्य, विनोद नाही, मानवी भावनांचा आविष्कार नाही. या घरांमध्ये कुत्री आणि मांजरांची कमतरता नाही. यापूर्वी २०२२ मध्येही पोप यांनी लोक मुलांऐवजी पाळीव प्राण्यांना प्राधान्य देत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणाले होते, मुलांना प्राधान्य देण्याऐवजी आज-काल आई-बाप पाळीव प्राण्यांमध्ये जास्त रमतात.
अशी जोडपी स्वार्थी, मानवी कुटुंबव्यवस्थेला धोका ठरू शकतात. पाळीव प्राणी दत्तक घेतल्याने लोक त्यांच्याशी भावनिक बंध निर्माण करतात. मात्र, पालक आणि मुलांमधील गुंतागुंतीचे नाते त्यांना कधीच अनुभवता येणार नाही. मुले नसतील तर वृद्धांच्या पेन्शनचा कर कोण भरणार? वृद्धांची काळजी कोण घेणार? मुले नसलेल्या लोकांचे म्हातारपण वाईट अवस्थेत संपेल.