मोहम्मद युनूस
वॉशिंग्टन : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेवरून हटवण्याचा कट रचल्याचे बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी मान्य केले आहे. अमेरिकेतील क्लिंटन ग्लोबल इनिशिएटिव्हच्या सभेत बोलताना त्यांनी ही कबुली दिली आहे. तसेच युनूस यांनी बांगलादेशातील विद्यार्थी नेत्यांचे कौतुक केले असून ते बांगलादेशचे नवीन रूप तयार करत असल्याचे मत व्यक्त केले आहे.
सभेला संबोधित करताना युनूस म्हणाले, देशातील निदर्शने अत्यंत सुनियोजित आंदोलन होते. त्यामध्ये एकाही व्यक्तीला नेता बनवून अटक करण्यात आली नव्हती. यामुळे संपूर्ण देशातील तरुणांना प्रेरणा मिळाली आणि ही चळवळ आणखीन मजबूत झाली.
यावेळी युनूस यांनी आपला साहाय्यक महफूज आलम यांची ओळख करून दिली. बांगलादेशच्या सध्याच्या रचनेला आपण दोघे जबाबदार असल्याचेही त्यांनी सांगितले. जर तुम्ही या विद्यार्थी नेत्यांचे चेहरे पाहिले तर ते सामान्य तरुणांसारखे दिसतील. जेव्हा ते बोलू लागतील तेव्हा तुम्ही थरथराल, प्रेरित व्हाल. त्यांनी आपल्या भाषणाने आणि समर्पणाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले.
युनूस म्हणाले, या आंदोलनामागे महफूजचा मेंदू होता. आपण आंदोलनामागे असल्याचे तो सतत नाकारत असतो, पण आंदोलनामुळेच त्याला ओळख मिळाली. ही चळवळ अचानक सुरू झालेली नाही. या चळवळीचे नेतृत्वही पूर्ण तयारीनिशी बनलेले होते. या काळात हा नेता कोण आहे, हे कोणालाही माहिती नव्हते.
युनूस यांनी विद्यार्थी नेत्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी शेख हसीना यांच्या सरकारच्या काळात विद्यार्थी नेत्यांवर झालेल्या हल्ल्यांचाही उल्लेख केला. गोळीबार होऊनही हे विद्यार्थी नेते पूर्ण शौर्याने उभे राहिले. युनूस यांच्या भाषणावेळी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन त्यांच्या शेजारी उपस्थित होते.
बांगलादेशातील हिंसाचारानंतर माजी पंतप्रधान शेख हसीना ५ ऑगस्ट रोजी भारतात आल्या होत्या. त्यापूर्वी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. २२ ऑगस्ट रोजी अंतरिम सरकारने हसीना आणि त्यांच्या कुटुंबीयांचे राजनैतिक पारपत्रेही रद्द केली होती.
हसीनांच्या राजीनाम्यानंतर ८ ऑगस्ट रोजी बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले. नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांना सरकारचे मुख्य सल्लागार बनवण्यात आले.
बांगलादेशच्या अंतरिम सरकारमधील आरोग्य मंत्रालयाच्या प्रमुख नूरजहाँ बेगम २९ ऑगस्ट रोजी म्हणाल्या होत्या की, सरकारविरोधी निदर्शनांमध्ये एक हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ४०० हून अधिक जणांची दृष्टी गेली. अनेकांची एक किंवा दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली आहे. बांगलादेशमध्ये १६ जुलै २०२४ रोजी सरकारविरोधी निदर्शने सुरू झाली. १९७१ नंतर सुरू झालेले हे देशातील सरकारविरोधातील सर्वात मोठे आंदोलन होते.