पाकने हिंसाचारावर बोलणे ही सर्वात मोठी दांभिकता

संयुक्त राष्ट्रे: संयुक्त राष्ट्राच्या ७९ व्या आमसभेत भारताने पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. जो देश दहशतवाद पोसतो त्याने हिंसाचारावर बोलणे म्हणजे दांभिकतेचे मोठे उदाहरण आहे, असा टोला भारताने लगावला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sun, 29 Sep 2024
  • 02:24 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या आरोपावर भारताने सुनावले खडेबोल

संयुक्त राष्ट्रे: संयुक्त राष्ट्राच्या ७९ व्या आमसभेत भारताने पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. जो देश दहशतवाद पोसतो त्याने हिंसाचारावर बोलणे म्हणजे दांभिकतेचे मोठे उदाहरण आहे, असा टोला भारताने लगावला. 

आमसभेत पाकिस्तानने नेहमीप्रमाणे भारताच्या विरोधात गरळ ओकली. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतात इस्लामोफोबिया वाढल्याचे प्रतिपादन केले. यावर भारताच्या राजनैतिक अधिकारी भाविका मंगलानंदन यांनी आमसभेतच पाकिस्तानला खडेबोल सुनावले. त्या म्हणाल्या, जो देश लष्कराकडून चालविला जातो. ज्यांना जागतिक पातळीवर दहशतवाद, अमली पदार्थांचा व्यापार आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीसाठी ओळखले जाते, त्या देशाने जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीवर हल्ला करण्याचे धाडस केले आहे. आमसभेत आज खेदजनक बाब घडली असून आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहोत. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारताचा उल्लेख केला. पाकिस्तान शेजारी देशाच्या विरोधात सीमेपलीकडून दहशतवादाचा वापर करतो आहे, हे जगाला माहीत आहे. त्यांनी आमच्या संसदेवर, आर्थिक राजधानी मुंबईवर, शेअर बाजार आणि तीर्थयात्रेच्या मार्गावर हल्ले केले. ही यादी बरीच मोठी आहे. अशा देशाने हिंसाचारावर बोलणे यापेक्षा मोठे दांभिकतेचे उदाहरण असू शकत नाही. खरे सांगायचे तर पाकिस्तानला भारताचा भूभाग बळकाविण्याची इच्छा आहे. त्यामुळेच भारताचा अविभाज्य भाग असलेल्या जम्मू आणि काश्मीरमध्ये लोकशाही मार्गाने होत असलेल्या निवडणुकांमध्ये दहशतवादाचा वापर करत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत आहे. शेजारी देशाने हेही लक्षात घेतले पाहिजे की, भारताविरुद्ध सीमेपलीकडून होणारा दहशतवाद हा अपरिहार्य परिणामांना आमंत्रण देणारा असेल.

शरीफ काय म्हणाले होते?

७९ व्या आमसभेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताने घटनेतील ३७० कलम हटविल्याकडे लक्ष वळविले. तसेच हिजबुलचा कमांडर बुऱ्हान वाणीच्या मृत्यूचा विषय उपस्थित केला.  शरीफ यांनी ३७० कलम लागू करून शांतता प्रस्थापित करावी, असे प्रतिपादन केले. काश्मिरी जनतेच्या इच्छेनुसार आणि संयुक्त राष्ट्राच्या ठरावानुसार भारताने काश्मीर समस्येवर शांततापूर्ण चर्चा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही शरीफ म्हणाले. पॅलेस्टिनी आणि काश्मिरी लोक हे एकसारखेच असल्याचे सांगताना शरीफ म्हणाले की, पॅलेस्टाईनमधील जनता आणि जम्मू-काश्मीरच्या लोकांमध्ये काहीही फरक नाही. दोन्हीकडील नागरिक हे स्वातंत्र्य आणि आत्मसन्मानासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहेत. भारतात मुस्लिमांना लक्ष्य केले जात आहे. तसेच इस्लामोफोबियातही वाढ होत असून ही जगासाठी एक त्रासदायक बाब ठरत आहे. भारतात हिंदू वर्चस्ववादाचा अजेंडा राबविला जात असून इस्लामोफोबियाचे हे सर्वात भयानक उदाहरण आहे. भारतातील २० कोटी मुस्लिमांना दमन करण्यात येत असून इस्लामिक वारसा नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. 

कोण आहेत भाविका मंगलानंदन?

भाविका मंगलानंदन या राजनैतिक अधिकारी आहेत. त्यांची संयुक्त राष्ट्रात भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. त्यांनी २०११ मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली येथून पदवी प्राप्त केली. २०१५ मध्ये यूपीएससी परीक्षा पास होऊन त्यांची निवड इंडियन फॉरेन सर्व्हिससाठी झाली. वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest