संग्रहीत छायाचित्र
पुणे- २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवासंबधी मार्क झुकरबर्गच्या पोस्टबद्दल मेटाने माफी मागितली आहे. मेटा ही फेसबुकची मालकी असलेली कंपनी आहे, ज्याचे अध्यक्ष आणि संस्थापक झुकरबर्ग आहेत. झुकरबर्गने चुकून एका पोस्टमध्ये लिहिले होते की कोरोना काळानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये भारतासह जगातील बहुतेक देशांमधील सरकारने त्यांची सत्ता गमावली. त्यांच्या या पोस्टवर आक्षेप व्यक्त करण्यात आला. याशिवाय, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी X वर पोस्ट करून या प्रकरणावर मेटाला जाब विचारला होता. मेटाने आता यावर प्रतिक्रिया दिली आहे आणि माफी मागितली आहे.
अश्विनी वैष्णव यांनी X वर लिहिले, 'जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात २०२४ मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यात ६४ कोटी मतदारांनी आपला हक्क बजावला. भारतातील जनतेने पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारवर विश्वास व्यक्त केला. झुकरबर्ग यांनी असा दावा केला की कोरोना काळानंतर, भारतासह जगातील बहुतेक सरकारे निवडणुका हरले आहेत, जे चुकीचे होते. ८० कोटी लोकांना मोफत रेशन, २.२ अब्ज लसी आणि कोरोना काळात जगभरातील देशांना मदत केल्याने, भारत ही सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. पंतप्रधान मोदींचा सलग तिसरा विजय हा जनतेचा त्यांच्या कामावर विश्वास असल्याचा पुरावा आहे. मेटा झुकरबर्ग स्वतः चुकीची माहिती पसरवत आहेत हे पाहून निराशा झाली. विश्वास टिकून राहावा म्हणून कृपया तथ्ये बरोबर ठेवा, असेही त्यांनी X वर लिहिले आहे.
आता मेटाचे सार्वजनिक धोरण उपाध्यक्ष शिवंथ ठुकराल यांनी लिहिले की, 'माननीय मंत्री अश्विनी वैष्णव.' २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुतेक सरकारे परत येत नाहीत ही मार्कची टिप्पणी अनेक देशांसाठी खरी होती. पण भारताबद्दल ते चुकीचे आहे. या चुकीबद्दल आम्ही माफी मागतो.
दरम्यान, भाजपने या प्रकरणात झुकरबर्गला समन्स जारी करून त्यांना हजर राहण्यास बोलावण्याची मागणी करण्यात आली होती, परंतु मेटाने या प्रकरणाचे गांभीर्य समजून बिनशर्त माफी मागितली आहे.