संग्रहित छायाचित्र
वॉशिंग्टन : अमेरिकेतील लॉस एंजिल्सच्या जंगलांमधील आगीचे थैमान कायम असून पाच दिवसांनंतरही आगीवर नियंत्रण आणणे शक्य झालेले नाही. या आगीमुळे आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. येत्या काही दिवसात मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत सध्या थंडी आहे. मात्र तरीही आग विझण्याऐवजी अधिक पसरत आहे. ताशी ९६ किलोमीटर वेगाने वारे वाहात असून हे वारे थांबणार नाहीत तोवर आग आटोक्यात आणणे शक्य होणार नसल्याचे स्थानिक प्रशासनाचे म्हणणे आहे.
आतापर्यंत या आगीमुळे १३ लाख कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. वाऱ्याचा वेग आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून सहा दिवसांनंतरही वणवा अजूनही कायम आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मेक्सिकोहून दाखल झालेले अग्निशमन दल प्रयत्न करत आहे. वणवा विझवण्यासाठी पाण्याचा प्रचंड वापर केल्याने २० टक्के तलाव सुकले आहेत. पाण्याचा वापर जास्त केल्यामुळे काही ठिकाणी दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत पॅरिस हिल्टन, टॉम हॅक्स, स्टीव्हन स्पीलबर्ग यांची घरे जळाली आहेत.
अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांचे घरही रिकामे करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आग लांबपर्यंत पसरत आहे. गेल्या २४ तासांत आग पेलिसाडेसच्या एक हजार एकरमध्ये पसरली आहे. दुसरीकडे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हवामान बिघडल्यामुळे आग अधिक पसरू शकते. सँटा एनाच्या पर्वतरांगांवरून येणाऱ्या वाऱ्याचा वेग लॉस एंजिल्स आणि वेचुरा काऊंटीमध्ये अधिक वाढण्याची शक्यता आहे आणि वाऱ्याची गती १२० किलोमीटर प्रतितासपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सोमवार आणि मंगळवारपर्यंत अशी परिस्थिती उद्भवू शकते. या पार्श्वभूमीवर आग केवळ पसरणार नाही तर अधिक भयावह रूप धारण करेल. लॉस एंजिल्स परिसरातील ८७ हजार नागरिकांची घरे रिकामी करण्यात आली असून त्यांना इतर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
आजवरची सर्वात घातक नैसर्गिक आपत्ती
कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसॅम यांच्या मते हा वणवा आता लॉस एंजिल्स परिसरापुरताच मर्यादित राहिलेला नसून ग्रेटर लॉस एंजिल्स परिसरातही पोहोचला आहे. तब्बल ४० हजार एकर परिसरात आग पोहोचली असून १२,६०० घरे जाळून खाक झाली आहेत. अमेरिकेच्या इतिहासातील आजवरची सर्वाधिक घातक नैसर्गिक आपत्ती असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
आगीमुळे प्रभावित क्षेत्र
मिळालेल्या माहितीनुसार, पॅलिसेड्स, ईटन, केनेथ आणि हर्स्ट या भागांमध्ये आगीचा मोठा परिणाम झाला आहे. यामुळे केवळ लोकांची घरेच नव्हे तर मशिदी, चर्च आणि आराधनालयांसारखी धार्मिक स्थळेही नष्ट झाली आहेत. अनेक सेलिब्रिटींची घरेदेखील आगीत जळाली आहेत. या आगीमुळे शैक्षणिक व्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. जवळपास ३३७ शाळा बंद करण्यात आल्या आहेत.