संग्रहित छायाचित्र....
Justin Trudeau Resigned : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी सोमवारी (6 जानेवारी 2025) पंतप्रधान पदाचा आणि लिबरल पक्षाच्या नेत्याचा राजीनामा दिला आहे. कॅनेडियन वृत्तपत्र ग्लोब अँड मेलनुसार, कॅनडाच्या पंतप्रधानांनी म्हटले आहे की, "जोपर्यंत नवीन पंतप्रधान नियुक्त होत नाही तोपर्यंत ते या पदावर राहतील. देशातील खासदारांच्या वाढत्या विरोधामुळे ट्रुडो यांना राजीनामा द्यावा लागला होता."
ते म्हणाले, "मी पक्षाच्या नेत्याचा, पंतप्रधानपदाचा राजीनामा देत आहे आणि जोपर्यंत पक्ष पुढचा नेता निवडत नाही तोपर्यंत पदावर राहीन. काल रात्री मी लिबरल पक्षाच्या अध्यक्षांना ती प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले आहे."
राजीनाम्याची गरज का पडली?
जस्टिन ट्रुडो यांच्या लिबरल पक्षावर अनेक दिवसांपासून टीका होत आहे. महागाई आणि दैनंदिन खर्च कमी करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला जात होता. दरम्यान, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेवर येताच कॅनडावर 25 टक्के शुल्क लागू करणार असल्याची घोषणा केली. या मुद्द्यावरून ट्रुडो यांनाही खूप पेच सहन करावा लागला आणि ते त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांच्या टीकेचे बळी ठरले. परिस्थिती आणखी बिकट झाली जेव्हा त्यांच्या सरकारच्या उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री क्रिस्टिया फ्रीलँड यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली.
कॅनडात मोठी राजकीय उलथापालथ झाली असून जस्टिन ट्रुडो यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचसोबत त्यांनी खासदारांच्या दबावामुळे लिबरल पार्टीच्या नेतेपदाचाही राजीनामा दिला आहे. जोपर्यंत नवीन पंतप्रधान नियुक्त होत नाही तोपर्यंत जस्टिन ट्रुडो हे काळजीवाहू पंतप्रधान असणार आहेत.… pic.twitter.com/QPTHbUSgAj
— Civicmirrorofficial (@civicmirrorpune) January 7, 2025
राजीनामा देताना क्रिस्टिया फ्रीलँड यांनी म्हटले होते की, जर अमेरिकेने कॅनडावर 25 टक्के शुल्क लादले तर त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडेल. जस्टिन ट्रुडो यांच्याबाबत ते पुढे म्हणाले की, "देशाची आर्थिक स्थिती सुधारण्याऐवजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो देशाला परवडणारे नाही असे ‘महागडे राजकारण’ करत आहेत." यानंतर त्यांच्या अल्पमतातल्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या एनडीपीनेही जस्टिन ट्रुडो यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची धमकी दिली होती.
दरम्यान, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी 2015 मध्ये पहिल्यांदा निवडणूक जिंकून कॅनडाचे पंतप्रधानपद भूषवले. त्यानंतर 2019 आणि 2021 च्या निवडणुकांमध्येही त्यांनी लिबरल पार्टीला विजय मिळवून दिला. मात्र, सध्या परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसत आहे.