आता चीनच कर्जबाजारी पाकिस्तानचा तारणहार; मित्राकडे केली अधिक कर्जाची मागणी

इस्लामाबाद : पाकिस्तान सध्या भीषण आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. त्यामुळे कोट्यवधींच्या कर्जासाठी त्याला इतर देशांकडे हात पसरावे लागत आहेत. या अगोदर आयएमएफने (आंतरराष्ट्रीय नाणेनिधी) पाकिस्तानला कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Edited By Desk User
  • Mon, 28 Oct 2024
  • 06:32 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

आयएमएफचे कर्ज घेऊनही पाकिस्तानची आर्थिक विवंचना घटेना

इस्लामाबाद : पाकिस्तान सध्या भीषण आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. त्यामुळे कोट्यवधींच्या कर्जासाठी त्याला इतर देशांकडे हात पसरावे लागत आहेत. या अगोदर आयएमएफने (आंतरराष्ट्रीय नाणेनिधी) पाकिस्तानला कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले. परंतु संकटाची मालिका काही संपत नसल्याने आता पाकिस्तानने चीनकडे हात पसरले असून, त्यांच्याकडे अतिरिक्त १० अब्ज युआन म्हणजेच तब्बल १.४ अब्ज डॉलर्सच्या कर्जाची मागणी केली आहे. पैशांच्या तुटवड्याचा सामना करीत असलेल्या पाकिस्तानने या आधीच चीनकडून ३० अब्ज युआनच्या चिनी व्यापार सुविधेचा लाभ घेतला आहे.

या संदर्भात पाकिस्तानी अर्थ मंत्रालयाने निवेदनही जारी केले आहे. यामध्ये अर्थमंत्री मुहमद औरंगजेब यांनी वाशिंग्टनमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीदरम्यान चीनचे अर्थमंत्री लियाओ मिन यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे करन्सी स्वॅप कराराची मर्यादा ४० अब्ज युआन करण्याची विनंती केली. दरम्यान, चीनने पाकिस्तानची ही मागणी मान्य केली तर पाकिस्तानला देण्यात आलेली एकूण व्यापार सुविधा ५.७ अब्ज डॉलरवर पोहोचेल. त्यामुळे पाकिस्तान दिवसेंदिवस आर्थिक खाईत अडकत चालले असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पाकिस्तानने या आधीही चीनकडून कर्ज वाढविण्यासाठी प्रस्ताव ठेवला होता. मात्र, चीनने त्या प्रस्तावावर काहीही विचार केला नाही. पाकिस्तानकडून देण्यात आलेला हा नवा प्रस्ताव चीनकडून सध्याची ४.३ अब्ज डॉलर्सची सुविधा पुढील ३ वर्षांसाठी वाढविल्यानंतर अवघ्या २ आठवड्यांच्या आत देण्यात आली आहे.

आयएमएफने पाकिस्तानला बेलआऊट पॅकेज देण्याआधी त्यांच्यासमोर आपल्या कर्जदारांकडून घेतलेल्या कर्जाची मर्यादा वाढवून घेण्याची अट ठेवली होती. त्यानंतर पाकिस्तानने चीन आणि सौदी अरब या देशांना त्यांची अडचण सांगत वेळ मर्यादा वाढविण्याची विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर चीन सरकारने पाकिस्तानची कर्जाची मर्यादा वाढविली होती. त्यानंतर आयएमएफकडून त्यांना बेलआऊट पॅकेज मिळू शकले. याशिवाय चिनी पंतप्रधान ली क्विंग यांच्या दौऱ्यावेळी दोन्ही देशांनी यासंबंधी करारावर हस्ताक्षर केले होते. त्यानुसार पाकिस्तानचा कर्ज फेडण्याचा कालावधी २०२७ पर्यंत वाढवण्यात आला होता. आधीच कालावधी वाढविलेला असताना पुन्हा कर्जाची मागणी केली. त्यामुळे चीनच्या कर्जाच्या ओझ्याने पाकिस्तानचे कंबरडे मोडत चालल्याचे चित्र आहे.

शेवटचे बेलआऊट पॅकेज

पाकिस्तान दिवसेंदिवस जास्त कर्जबाजारी होत चालला आहे. त्यामुळे पाकिस्तानची आर्थिक स्थिती ढासळत चालली आहे. आयएमएफ पॅकेजच्या आधी पीएम शहाबाज शरीफ यांनी पाकिस्तानसाठी हे शेवटचे बेलआऊट पॅकेज असेल, असे सांगितले होते. मात्र, यासाठी फक्त सरकारच नाही तर देशातील नागरिकांनाही अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest