संग्रहित छायाचित्र
किव : रशिया आता उत्तर कोरियाच्या सैन्याला युद्धात उतरवण्याच्या तयारीत आहे. असा दावा युक्रेनचे अध्यक्ष ब्लादिमीर झेलेन्स्की यांनी शुक्रवारी केला. युक्रेनच्या गुप्तचर संस्थेच्या दाव्यानुसार उत्तर कोरियाने १२ हजार सैनिक रशियाला पाठवले आहेत. यामध्ये पाचशे अधिकारी आणि तीन जनरलचा समावेश आहे.
येत्या आठवड्यात हे कोरियन सैन युद्धात प्रत्यक्ष भाग घेईल. युरोपीयन देशांनी मात्र इंडो-पॅसिफिक प्रदेशाचा सत्ता समतोल ढासळेल व त्याचे संपूर्ण जगावर परिणाम होतील अशी भीती व्यक्त केली आहे. युक्रेनच्या गुप्तचर संस्थांनी दिलेल्या गुप्त माहितीनुसार राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी हा दावा केला. त्यांनी माहिती देताना पुढे सांगितले की, उत्तर कोरियाच्या सैनिकांना रविवार आणि सोमवार दरम्यान युद्धात पाठवले जाईल.
याआधी बुधवारी अमेरिकेने दावा केला होता की, रशियात अगोदरच उत्तर कोरियाचे तीन हजार सैनिक तैनात आहेत. या सैनिकांना रशियाच्या पूर्व भागातील लष्करी तळांवर प्रशिक्षण देण्यात आले आहे. उत्तर कोरियाने गेल्या आठवड्यात १५ हजार सैनिक पाठवले असा दावा दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेने केला आहे. दक्षिण कोरियाची गुप्तचर संस्था नॅशनल इंटेलिजन्स सर्व्हिसेसने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली होती. दाव्यानुसार गेल्या आठवड्यात १८ ऑक्टोबरला दक्षिण कोरियानेही दावा केला होता की, उत्तर कोरियाने युक्रेन युद्धात रशियाला मदत करण्यासाठी सैन्य पाठवले होते.
रशियाच्या व्लादिवोस्तोक बंदरावर दिनांक ८ ते १३ ऑक्टोबर दरम्यान पंधराशे उत्तर कोरियन सैनिक रशियन नौदलाच्या जहाजांवरून पोहोचले. उत्तर कोरियाच्या स्पेशल मिशन फोर्सचा हे सर्व सैनिक भाग आहेत. रशियामध्ये उत्तर कोरिया लवकरच आणखी काही सैन्य पाठवणार असल्याचा दावा एजन्सीने केला आहे.