कॅटालिन कॅरिको, ड्रयू वेसमन यांना नोबेल पुरस्कार
२०२३ साठीच्या शरीरविज्ञान किंवा औषधशास्त्रासाठीच्या नोबेल पारितोषिकांची (Nobel Prize) घोषणा झाली आहे. कॅटलिन कारिको आणि ड्रिव वेईसमन यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रभावशाली एमआरएनए कोविड लस निर्मितीमध्ये या शास्त्रज्ञांचे महत्त्वाचे योगदान होते.
कोरोना महामारीच्या काळात जगावर मोठे संकट ओढवले होते. यावेळी कोरोना विषाणूचा प्रतिकार करणारी लस निर्माण करणे आवश्यक होते. अशा काळात या दोन्ही वैज्ञानिकांनी एमआरएनए आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर कसा प्रभाव टाकतो याचा अभ्यास केला. त्यांच्या या अभ्यासामुळे मोठ्या प्रमाणात कोरोना लस निर्मिती शक्य झाली, असे नोबेलच्या समितीने घोषणा करताना सांगितले. नोबेल पुरस्कार हा अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जातो. दरवर्षी हा पुरस्कार असामान्य काम करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. नोबेल समितीमध्ये ५० तज्ज्ञांचा समावेश होता. मानवजातीसाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या औषधशास्त्रातील वैज्ञानिकांना हा पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत शरीरविज्ञान किंवा औषधशास्त्रामध्ये ११३ नोबेल पारितोषिक जाहीर झालेले आहेत. १९०१ पासून हे पुरस्कार दिले जातात. आतापर्यंत १२ महिलांना हा पुरस्कार मिळाला आहे. फ्रेडरिक जी बँटिंग हे सगळ्यात कमी वयात पुरस्कार मिळणारे वैज्ञानिक आहेत. त्यांना वयाच्या ३२ व्या वर्षी इन्सुलिनच्या शोधासाठी नोबेल पुरस्कार मिळाला होता.
कोण आहेत ड्रयू वेसमन?
ड्रयू वेसमन यांचा जन्म मॅसॅच्युसेट्समध्ये १९५९ मध्ये झाला. त्यांनी १९८७ मध्ये बोस्टन विद्यापीठातून पीएच डी आणि एमडी पदव्या मिळवल्या. यानंतर, त्यांनी हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या बेथ इस्राएल डेकोनेस मेडिकल सेंटरमध्ये क्लिनिकल प्रशिक्षण सुरू ठेवले. १९९७ मध्ये, वेसमनने स्वतःचा संशोधन ग्रुप स्थापन केला. पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील पेरेलमन स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये त्यांनी संशोधन सुरू केले. सध्या ते पेन इन्स्टिट्यूट ऑफ आरएनए इनोव्हेशनचे संचालक आहेत.
कोण आहेत कॅरिको?कॅटालिन
कॅरिकोचा जन्म १९५५ मध्ये जोलनोक, हंगेरी येथे झाला. त्यांनी १९८२ मध्ये जेगेड विद्यापीठातून पीएच डी केली. यानंतर त्यांनी हंगेरियन अकादमी ऑफ सायन्सेसमध्ये पोस्ट-डॉक्टरल फेलोशिप पूर्ण केली. यानंतर त्यांनी टेम्पल युनिव्हर्सिटी, फिलाडेल्फिया येथे पोस्ट-डॉक्टरेट संशोधन पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात साहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. २०१३ नंतर, कॅटालिन बायो एन टेक आरएनए फार्मास्युटिकल कंपनीच्या वरिष्ठ उपाध्यक्ष झाल्या.