File Photo
जेरुसलेम : लेबनॉनवरील हवाई हल्ले थांबवून २१ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा करावी, असा प्रस्ताव अमेरिका आणि फ्रान्स यांनी इस्राएल सरकारला दिला होता. मात्र, इस्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. या संदर्भात इस्राएलच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे. याउलट हिजबुल्लाहशी सर्वशक्तिनिशी लढण्याचे आदेश लष्कराला दिले असल्याचे इस्राएल सरकारकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही देशांदरम्यान होणारे हल्ले इतक्यात थांबतील, याची शक्यता कमी आहे.
इस्राएलचे परराष्ट्रमंत्री कॅटझ यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिका आणि फ्रान्सने युद्धाविराम करण्यासंदर्भात दिलेला प्रस्ताव इस्राएलने फेटाळला आहे. जोपर्यंत हिजबुल्लाहला संपवण्याचे आमचे लक्ष्य पूर्ण होणार नाही, तोपर्यंत उत्तर लेबनॉनवरील आमचे हल्ले सुरू राहतील. हिजबुल्लाहशी आम्ही सर्वशक्तिनिशी लढत राहू, असे ते म्हणाले.
अमेरिका आणि फ्रान्सने लेबनॉनवरील हल्ले थांबवण्याचा प्रस्ताव इस्राएल सरकारला दिला होता. युद्धविराम घोषित करून चर्चेतून मार्ग काढावा, अशी विनंती दोन्ही देशांकडून करण्यात आली होती. या प्रस्तावाला ऑस्ट्रेलिया, कॅनडा, सौदी अरेबिया तसेच काही युरोपीय देशांनी समर्थन दिले होते. मात्र, आता इस्राएलने हा प्रस्ताव नाकारला.
दरम्यान, इस्राएल आणि लेबनॉन २००६ पासून एकमेकांवर हल्ले करत आहेत. गेल्या आठवड्यात लेबनॉनमध्ये झालेल्या पेजरच्या स्फोटानंतर या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पेजरच्या स्फोटानंतर लेबनॉननेही इस्राएलवर क्षेपणास्र डागली होती. त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून इस्राएलनेही लेबनॉनवर हल्ला केला.
या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत ६०० पेक्षा जास्त हिजबुल्लाहच्या सैनिकांचा मृत्यू झाला आहे. इस्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी लेबनॉनला लागून असलेल्या इस्राएलच्या सीमावर्ती भागातील लोकांना घरे रिकामी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे इस्राएली लष्कर जमिनीवर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा चालू आहे.