चुकीला माफी नाही! ऑलिम्पिकमध्ये पदक न जिंकलेल्या उत्तर कोरियाच्या खेळाडूंना शिक्षेची धास्ती
प्योन्गयाँग: पॅरिस ऑलिम्पिकचा सांगता सोहळा नुकताच पार पडला. ऑलिम्पिक स्पर्धेनंतर आता खेळाडू मायदेशी परतले आहेत. मात्र, उत्तर कोरियाच्या खेळाडूंनी मायदेशी परतताना शिक्षेची धास्ती घेतली आहे. कारण उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन याचा विचित्र स्वभाव त्यासाठी कारणीभूत आहे.
किम जोंग-उन या तरुण हुकूमशहाचे वागणेच तसे अजब आहे. आता क्रीडास्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना मायदेशी परतताना अनेक प्रश्न पडले आहेत. कारण विजेत्यांचे उत्तर कोरियात स्वागत होते, पराभूत खेळाडूंना शिक्षा मिळते. यावेळी विजेत्या खेळाडूंनाही शिक्षा होण्याची शक्यता वाटत आहे. कारण त्यांनी दक्षिण कोरियाच्या खेळाडूंसोबत एक सेल्फी काढलेला आहे. ही बाब उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उनला आवडणार नाही, त्यामुळे त्यांना शिक्षा होण्याची भीती वाटत आहे. उत्तर कोरियाच्या एकूण १६ खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवला होता. त्यापैकी ६ खेळाडूंना पदक जिंकला आले आहे. यामध्ये ४ कांस्य तर २ रौप्य पदकांचा समावेश आहे. उत्तर कोरियामध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंचा सन्मान केला जातो. स्वत: किम जोंग उन त्यांचे स्वागत करतो आणि त्यांना भेटवस्तू देखील देतो.
चुकीला माफी नाही !
कुठल्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पराभव पत्करणाऱ्या खेळाडूला मात्र प्रचंड भीती असते. कारण आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पराभव पत्करावा लागल्याबद्दल किम त्याला कठोर शिक्षा करतो. या ऑलिम्पिकमध्ये ज्यांना पदक जिंकता आलेले नाही, त्यांची काही खैर नाही. पदक जिंकता आले नाही तर खेळाडूंना शिक्षा दिली जाते. तेही शारीरिक परिश्रमाची ! मागील ऑलिम्पिक्समध्ये ज्या खेळाडूंना पदक जिंकला आले नव्हते त्यांना प्रतिकूल हवामान असलेल्या घरात कोंडून ठेवले गेले. तसेच खेळाडूंना कोळशाच्या खाणीत कामाला पाठवले जाते, अशी देखील माहिती समोर आली होती.