जोहान्सबर्ग : आफ्रिका खंडातील अनेक देशांमध्ये सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून याची सर्वाधिक झळ नामिबिया देशाला बसली आहे. या देशातील नागरिक अन्नालाही मोताद झाले आहेत.
अशा स्थितीत भूकबळीने आपल्या नारिकांचा मृत्यू होऊ नये यासाठी नामिबियाने ८३ हत्तींसह जंगलातील ७२३ प्राणी मारुन त्यांचं मास जनतेला खाण्यासाठी देण्याचे आदेश दिले आहेत.
नामिबिया सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सरकारने ८३ हत्ती, ३०० झेब्रा, ३० पाणघोडे, ६० म्हशी यासह एकूण ७२३ प्राणी मारण्याचे आणि त्यांचे मांस जनतेला खाण्यासाठी देण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे भुकेकंगाल जनतेची अन्नाची गरज भागेल.
त्याचबरोबर प्राणी संवर्धनावरील सरकारचा खर्चही कमी होईल. नामिबिया सरकारने नामिब नौक्लुफ्ट पार्क, मँगेट्टी नॅशनल पार्क, ब्वाबवाता नॅशनल पार्क, आणि एनकासा रुपारा नॅशनल पार्कमधील प्राण्यांना मारण्याचे आदेश दिले आहेत.
आफ्रिका खंडातील काही देश सध्या भीषण दुष्काळाचा सामना करत आहेत. या देशांमधील अन्नसाठा जवळपास संपुष्टात आला आहे. अनेकांना खायला अन्नही मिळत नसल्याची परिस्थिती आहे. संयुक्त राष्ट्राने पुढच्या काही महिन्यांत नामिबियात आणखी भीषण अन्न टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे.
अशा परिस्थितीत मानव-वन्यजीव संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेण्यात आल्याचं नामिबियाचे म्हणणे आहे. महत्त्वाचे म्हणजे अशाप्रकारे प्राण्यांची हत्या करून त्यांचे मांस जनतेला खायला देण्याची ही पहिलीच वेळ नाही. नामिबियाने यापूर्वीसुद्धा अशाप्रकारचा निर्णय घेतला आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या दुष्काळात सरकारने २०० पेक्षा जास्त प्राणी मारण्याची आदेश दिले होते.