संग्रहित छायाचित्र
वॉशिंग्टन: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रशिया दौरा अमेरिकेत पुन्हा एकदा उपस्थित झाला असून परराष्ट्र मंत्रालयावरील संसदीय समितीने यावर चर्चा केली. मोदींचा दौरा आणि त्यातून दिलेला संदेश निराशाजनक असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. ८ जुलैला मोदी रशियाला गेले तेव्हा नाटो देशांची बैठकही सुरू होती.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे अधिकारी डोनाल्ड लू म्हणाले, आम्ही या प्रकरणी भारतीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. मोदींच्या मॉस्को दौऱ्यावर अमेरिका बारकाईने लक्ष ठेवून होती. दोन्ही देशांदरम्यान कोणताही महत्त्वाचा संरक्षण करार झालेला नाही. तसेच, त्यावर कोणतीही विशिष्ट चर्चा झालेली नाही. बैठकीत अमेरिकी अधिकारी म्हणाला की, मोदींनी पुतिन यांना सांगितले की, युद्धभूमीवर समस्या सोडवता येणार नाहीत. मोदींनी युद्धात लहान मुलांच्या मृत्यूबद्दलही शोक व्यक्त केला होता. भारत- रशियात संरक्षण करार नसल्याचा व्हाईट हाऊसने विशेष उल्लेख केला आहे.
रिपब्लिकन पक्षाचे सदस्य जो विल्सन यांनी युक्रेनमधील मुलांच्या रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यादिवशी मोदींनी पुतिन यांना मिठी मारल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. यापूर्वी १९ जुलै रोजी मोदींच्या दौऱ्यावर अमेरिकेी राजदूताच्या वक्तव्यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मत व्यक्त केले होते. मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले होते की, भारत इतर देशांप्रमाणेच आपल्या सामरिक स्वातंत्र्याला महत्त्व देतो. अमेरिकेच्या राजदूतांना मत मांडण्याचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे आम्हीही वेगळा विचार करू शकतो. अमेरिकेशी असलेली आमची मैत्री आम्हाला एकमेकांच्या दृष्टिकोनाचा आदर करण्याचे स्वातंत्र्य देते. यामध्ये आम्ही दोघेही अनेक मुद्द्यांवर एकमेकांशी सहमत आणि असहमत असू शकतो.
अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी नवी दिल्लीत एका संरक्षण परिषदेत असे मत मांडले होते की, नवी दिल्ली आणि वॉशिंग्टनचे संबंध खूप मजबूत आहेत. भारताला आपले सामरिक स्वातंत्र्य आवडते. जग एकमेकांशी जोडले गेले आहे. आता कोणतेही युद्ध दूर नाही, त्यामुळे आपल्याला शांततेसाठी उभे राहून चालणार नाही, तर अशांतता निर्माण करणाऱ्या देशांवरही कारवाई करावी लागेल. भारत आपले भविष्य अमेरिकेकडे पाहतो आणि अमेरिकाही भारतामध्ये भविष्य पाहते.