संग्रहित छायाचित्र
वॉशिंग्टन : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भेटीत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची त्यांच्या नोवो ओगार्योवो या खासगी निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केल्यावर त्याच्या प्रतिक्रिया पाश्चात्य देशांमध्ये उमटू लागल्या आहेत. अमेरिकी प्रसारमाध्यमातील बातम्यांमुळे अमेरिका अस्वस्थ झाल्याचे दिसत असून मोदी यांच्या भेटीमुळे जागतिक राजकारणात पुतीन यांना एकटे पाडण्याचे प्रयत्नांना खीळ बसण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यातच युक्रेन नाराज झाल्याचे सांगण्यात येते.
मोदींनी ऑस्ट्रियाला रवाना होण्यापूर्वी मंगळवारी भारतीय समुदायाला संबोधित केले. तसेच २२ व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेत भाग घेतला.
रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतरचा पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच रशिया दौरा होता. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावर प्रसारमाध्यमांनी व्यक्त केलेली मते लक्षवेधी आहेत.
NYT या भेटीबाबत अमेरिकेच्या 'द न्यूयॉर्क टाइम्स'ने म्हटे आहे की, मोदींच्या मॉस्को दौऱ्यामुळे पुतिन यांना एकाकी पाडण्याचे प्रयत्न कमकुवत झाले आहेत. तसेच युक्रेनची नाराजी वाढली आहे. पाश्चिमात्य देश रशियाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असले तरी रशिया ज्या प्रकारे इतर देशांशी आपले संबंध वाढवत आहे, त्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात स्वस्त तेल खरेदी केले असून त्यामुळे आंतरराष्ट्रीय निर्बंधांना सामोरे जाणाऱ्या रशियाची आर्थिक स्थिती सुधारली आहे. पुतिन यांच्यासाठी मोदींचा दौरा हे दाखवण्याचा भाग आहे की, भारताचे अमेरिकेसोबतचे संबंध दृढ होत असले तरी, रशिया आणि भारतातील सखोल संबंध कायम आहेत.
बीबीसीने म्हटले आहे की, तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर मोदींची ही पहिलीच द्विपक्षीय भेट आहे. मॉस्कोतील छायाचित्रांमध्ये मोदी पुतीन यांना मिठी मारताना दिसले. नाटो देश युक्रेनवरील मॉस्कोच्या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध करत असताना मोदींनी पुतीन यांच्यावर आजपर्यंत स्पष्ट शब्दात टीकाही केलेली नाही. विविध निर्बंध लादून पाश्चात्य देश रशियाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र पुतीन भारत, चीनसारख्या देशांच्या नेत्यांशी संबंध दृढ करण्यात व्यस्त आहेत. मोदींची उपस्थिती पुतीनसाठी फायदेशीर सौदा ठरू शकते.
व्हॉईस ऑफ अमेरिका (व्हीओए) ने म्हटले आहे की, या भेटीतून मोदींना भारत-रशिया संबंध महत्त्वाचे असल्याचा संदेश रशियाला द्यायचा आहे.पुतिन यांच्यासाठी ही भेट महत्त्वाची आहे. यातून ते पाश्चिमात्य देशांना संदेश देत आहेत की त्यांनी लादलेल्या निर्बंधांचा रशियावर कोणताही परिणाम होत नाही. काही विश्लेषकांनी मोदी-पुतीनभेटीच्या वेळेकडेही विशेष लक्ष दिले आहे. वॉशिंग्टनमध्ये नाटो शिखर परिषद सुरू असताना हे घडत आहे.
ब्रिटिश वृत्तपत्र द गार्डियनने म्हटले आहे की, युक्रेनच्या संकटानंतरही मोदी-पुतिन मैत्री आणखी घट्ट झाली आहे. आपल्या भेटीत मोदींनी पुतीन यांना सल्ला दिला की शांततेचा मार्ग युद्धभूमीतून जात नाही. मोदींच्या शब्दांचा पुतीन यांच्या महत्त्वाकांक्षेवर काही परिणाम होईल असे वाटत नाही.
चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे की, पाश्चात्य देश भारताच्या रशियाशी घट्ट होत असलेल्या संबंधांबद्दल अधिक चिंतित असल्याचे दिसो. रशिया-भारत संबंधांना चीन धोका म्हणून पाहत नाही. पाश्चात्य देश भारताच्या रशियाशी असलेल्या संबंधांवर नाराज असल्याचे दिसते. पाश्चात्य देशांनी भारताला पाश्चिमात्य छावणीत खेचण्याचा आणि चीनचा प्रभाव संतुलित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना वाटत होते की भारत रशियाच्या विरोधात उभा राहील आणि त्यांच्याशी युती करेल. भारताच्या या हालचालीने त्यांची निराशा होत आहे.
अमेरिकच्या ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ म्हटले आहे की, युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर ही भेट स्पष्टपणे दर्शवते की अमेरिकेच्या दबावाला न जुमानता भारत रशियासोबत आपले मजबूत संबंध कायम ठेवणार आहे. सत्तेवर आल्यानंतर लगेचच मोदींनी रशियाला भेट दिली.यातून पुतीन यांना हे दाखवायचे आहे की भारत-अमेरिकेतील संबंध प्रगती करत असले तरी भारत अजूनही पाश्चिमात्य देशांच्या बाजूने गेलेला नाही.