संग्रहित छायाचित्र
इस्लामाबाद: आधीच्या दोन पतींचे निधन झाल्यानंतर एका महिलेने तिसऱ्या विवाहाची इच्छा व्यक्त केली म्हणून तिची हत्या करण्यात आल्याची घटना पाकिस्तानात समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिच्या सख्ख्या भावांनीच या महिलेची हत्या केली आहे. याआधीही पाकिस्तानच्या गुल शहरात एका महिलेने कौटुंबिक हिंसाचाराला कंटाळून घटस्फोटाची याचिका न्यायालयात दाखल केली म्हणून तिच्या वडिलांनी व काकांनी तिचे पाय कापल्याची घटना घडली होती.
कराचीमधील बहादूरबादमध्ये ही घटना घडली. संबंधित महिला तिच्या घरी असताना तिच्या दोन्ही भावांशी तिचा वाद झाला. आपण तिसरे लग्न करण्याचा विचार करत आहोत, असे या महिलेने तिच्या भावांना सांगितले असता त्यांच्यात मोठा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की दोघा भावांनी महिलेची गोळ्या झाडून हत्या केली. घटनेची माहिती मिळताच कराची पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी तिथे पोलिसांना घरात ३० पिस्तुले आणि झाडलेल्या दोन गोळ्यांचे कवच सापडले. या संदर्भात पुढील तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांनी नमूद केले आहे. दरम्यान, आधीच्या दोन पतींपासून सदर महिलेला एकूण ९ मुले असून त्यांची जबाबदारीही महिलेने स्वत: उचलण्याची तयारी दाखवली होती, अशी माहिती आता समोर येत आहे.
कौटुंबिक अत्याचाराच्या घटनांत वाढ
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या गुल शहरात कौटुंबिक हिंसाचाराला कंटाळून घटस्फोटाची याचिका दाखल करणाऱ्या महिलेचे पाय कापण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. सोबिया बतूल शाह असे या महिलेचे नाव आहे. या महिलेला तिच्या पतीकडून वारंवार मारहाण केली जात होती, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे आपल्याला घटस्फोट हवा असल्याची मागणी तिने केली होती. एकीकडे पतीकडून मारहाण होत असताना दुसरीकडे स्वत: या महिलेचे वडील व काकाच तिच्या विरोधात होते. त्यांच्यातील वाद इतके विकोपाला गेले की तिच्या वडिलांनी पोटच्या मुलीचे पाय छाटले. सोबियाचे वडील सय्यद मुस्तफा शाह, काका सय्यद कुर्बान शाह व त्यांचे सहकारी एहसान शाह, शाह नवाज व मुश्ताक शाह यांनी सोबियाचे पाय छाटल्यानंतर घरातून पोबारा केला. सोबियाला पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल केलं असून तिच्यावर उपचार चालू आहेत. दुसरीकडे सय्यद मुस्तफा शाह व सय्यद कुर्बान शाह यांच्यासह इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
पाकिस्तान महिलांसाठी असुरक्षित!
दोन दिवसांपूर्वीच पाकिस्तानमधील एका तरुणीने सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट व्हायरल झाली होती. त्यात एका बड्या कंपनीच्या नावाने वेबसाईटवर टाकण्यात आलेल्या नोकरीच्या बनावट जाहिरातीमुळे फसवणूक झाल्याचा उल्लेख तिने केला होता. समोरील व्यक्तीने कंपनीत नोकरीच्या बदल्यात तरुणीकडून मॅनेजरसाठी शारीरिक सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक खुलासा या तरुणीने केला आहे. पाकिस्तानमधील अदिना हिरा या तरुणीने नुकतीच तिच्या एक्स हँडलवर केलेली पोस्ट याच कारणामुळे व्हायरल होत आहे. या तरुणीने केलेल्या या पोस्टवर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. “पाकिस्तानमध्ये एक मुलगी म्हणून जगणं कठीण आहे. हा देश म्हणजे नरक झालाय”, असे या तरुणीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. घडलेला सगळा प्रकार विशद करतानाच मोबाईल चॅटचे काही स्क्रीनशॉट्सही तिने शेअर केले आहेत.