संग्रहित छायाचित्र
लंडन: अमेरिका, कॅनडामध्ये भारतीयांवर कारवाया होत असताना आता इंग्लंडमध्येही असे हल्ले होऊ लागले आहेत. यामुळे भारतीयासांठी आता लंडनही सुरक्षित राहिले नसल्याचा अनुभव येत आहे.
भारतीय लेखिका सौंदर्या बालसुब्रमणी यांना लंडनमध्ये मारहाण करण्यात आली असून त्यात त्यांचे नाक फ्रॅक्चर झाले आहे. तसेच हल्ल्यात त्यांनी एक डोळा जवळपास गमावला असून लंडनच्या रस्त्यावर हा अमानुष मारहाणीचा प्रकार झाला आहे. सौंदर्या यांनीच या घटनेचा अनुभव सांगितला आहे.
बालसुब्रमणी म्हणतात, १८ सप्टेंबरच्या दुपारी मी लंडनमध्ये रस्त्यावरून चालले असता एका धिप्पाड माणसाने माझ्याकडे तुम्ही मला काही पैसे देऊ शकता का, अशी विचारणा करत आर्थिक मदत मागितली. यावर मी त्याला नकार दिल्यावर त्याने माझ्या चेहऱ्यावर ठोसे मारले. माझं नाक त्याचवेळी फ्रॅक्चर झाले आणि काही सेकंदांसाठी मला काय घडलं ते कळलंच नाही. मी जेव्हा स्वतःकडे पाहिलं तेव्हा माझा शर्ट रक्ताने माखला होता. तसेच रस्त्यावरही रक्त सांडलं होतं. नाकातून रक्त वाहात होतं. मी इतक्या मोठ्या प्रमाणावर रक्त कधी पाहिलेलं नाही. मी कसंबसं मागे वळून पाहिलं तर ज्या माणसाने मला ठोसा मारला तो तिथे उभा होता आणि हसत होता. मात्र हा सगळा प्रकार घडल्यानंतर लोकांनी गर्दी केली. त्यानंतर पोलीस आले. मला रुग्णालयात नेण्यात आलं. मी डॉक्टरांना आठ तासांनी पाहिलं.
सौंदर्या पुढे पोस्टमध्ये म्हणतात, उपचार सुरू असताना माझ्या मनात विचार होता की डोळ्याला इजा झाली आहे. डोळा गमावला तर? मी डोळ्यांबाबत फार चिंता करत होते. डॉक्टरांनी मला सांगितलं तुमच्या ज्या डोळ्याला इजा झाली आहे तो सध्या उघडू शकत नाही. सिटी स्कॅन करून मला डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या नाकात फ्रॅक्चर आहेत. तुमचे डोळे ठीक आहेत. त्यानंतर मी सुटकेचा निश्वास सोडला आणि त्याक्षणी भारतात परतण्याचा निर्णय घेतला.
दुसऱ्या एका पोस्टमध्ये सौंदर्या म्हणतात, माझ्यावर जेव्हा हल्ला झाला, त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १९ सप्टेंबरला पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली. माझ्याआधी त्याने आणखी दोघांवर असाच हल्ला केला होता. त्याला अटक केली आहे आणि न्यायालय त्याला शिक्षाही सुनावेल अशी आशा आहे. मी तो प्रसंग विसरू शकत नाही. कशीबशी त्यातून सावरण्याचा प्रयत्न करते आहे. मागच्या आठवड्यात काय घडलं हा विचार केला तरी अंगावर काटा येतो. वृत्तसंंस्था