File Photo
न्यूयॉर्क : जगभरात पसरलेल्या कोरोना लाटेचा परिणाम चंद्रावरही झाल्याचे एका संशोधनात समोर आले आहे. रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीने याबाबतचे संशोधन केले होते. एप्रिल-मे २०२० मध्ये कडक लॉकडाऊन दरम्यान चंद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात घट नोंदवण्यात आली होती.
फिजिक्स रीसर्च लॅबच्या (पीआरएल) के. दुर्गा प्रसाद आणि जी. अम्बिली यांनी २०१७ ते २०२३ दरम्यान चंद्राच्या पृष्ठभागावर सहा ठिकाणी नऊ वेळा तापमान नोंदवले. ओशनस प्रोसेलेरम, मारे सेरेनिटाटिस, मारे इम्ब्रिअम, मारे ट्रॅनक्विलिटाटिस आणि मारे क्रिसियम या ठिकाणी तापमान नोंदवले गेले होते.
पीआरएलचे अनिल भारद्वाज यांनी याबाबत म्हटले की, आमच्या ग्रुपने एक महत्त्वाचे काम केले आहे, जे युनिक आहे. नासाच्या मून एक्सप्लोरेशन ऑर्बिटरच्या डेटाचा वापर करून, संशोधकांना असे आढळले की, लॉकडाऊन कालावधीत चंद्राचे तापमान ८ ते १० केल्विनने (उणे २६५.१५ ते उणे २६३.१५ अंश सेल्सिअस) कमी झाले.
लॉकडाऊन दरम्यान नोंदलेल्या तापमानाची तुलना मागील वर्षांतील तापमानाशी करण्यात आली. दुर्गा प्रसाद यांनी म्हटले की, आम्ही १२ वर्षांच्या डेटाचा अभ्यास केला आहे. मात्र संशोधनात २०१७ ते २०२३ पर्यंतचा डेटाच वापरला आहे. संशोधकांचे असे म्हणणे आहे की, लॉकडाऊनमुळे पृथ्वीवरील रेडिएशनमध्ये घट झाली होती. त्यामुळे चंद्राचे तापमानही कमी झाले आहे.
लॉकडाऊनमुळे हरित वायू आणि एरोसोल उत्सर्जनातही मोठी घट नोंदवण्यात आली आहे. याचा परिणाम असा झाला की, पृथ्वीच्या वातावरणात अशा वायूंचा प्रभाव कमी झाला आणि वातावरणातून उष्णतेचे उत्सर्जन कमी झाले. संशोधन पेपरमध्ये असे म्हटले आहे की, चंद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानावर सोलार अॅक्टिव्हिटी आणि हंगामी प्रभावाचा देखील अभ्यास करण्यात आला होता. परंतु असे आढळून आले की, त्यांचा पृष्ठभागाच्या तापमानावर कोणताही परिणाम होत नाही.
त्यामुळे कोविड लॉकडाऊनमुळे चंद्राच्या तापमानात घट झाल्याचे अभ्यासाचे निष्कर्ष सिद्ध करतात. मात्र संशोधकांनी कबूल केले आहे की, पृथ्वीवरील रेडिएशन आणि चंद्राचे तापमान यांच्यातील संबंध स्थापित करण्यासाठी अधिक डेटाची आवश्यकता आहे.