पूर्वीच्या विवाहबाह्य संबंधांची कमला यांच्या पतीची कबुली

अमेरिकेच्या उपाध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचे पती डग एमहॉफ यांनी आपल्या पूर्वीच्या विवाहबाह्य संबंधांची कबुली दिली आहे. आपल्या पहिल्या पत्नीसमवेत राहात असताना अन्य दुसऱ्या महिलेशी संबंध ठेवला होता, अशी कबुली त्यांनी एका ब्रिटिश वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान दिली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 5 Aug 2024
  • 01:19 pm
Kamala Harris, US vice president, Doug Emhoff, extramarital affairs, British newspaper,

संग्रहित छायाचित्र

पहिल्या पत्नीसमवेत असताना नॅनीशी आले संबंध, अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला येऊ लागली रंगत, एकमेकांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढण्यास येणार ऊत

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या उपाध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचे पती डग एमहॉफ यांनी आपल्या पूर्वीच्या विवाहबाह्य संबंधांची कबुली दिली आहे. आपल्या पहिल्या पत्नीसमवेत राहात असताना अन्य दुसऱ्या महिलेशी संबंध ठेवला होता, अशी कबुली त्यांनी एका ब्रिटिश वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान दिली आहे.

एका ब्रिटिश वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीनंतर ‘सीएनएन’शी बोलताना ते म्हणाले, माझी पहिली पत्नी कर्स्टिन आणि मी कठीण प्रसंगातून गेलो होतो. माझ्या काही चुकांमुळे आमच्यात तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी मी माझी जबाबदारी ओळखून काम केले आणि आम्ही त्यातून बाहेर पडलो.

डग एमहॉफ यांचे विधान ‘डेली मेल’ च्या बातमीनंतर आले आहे. या बातमीत म्हटले होते की, एमहॉफ यांचे पहिले लग्न विवाहबाह्य संबंधांमुळे तुटले होते. कर्स्टिन यांच्याबरोबर नात्यात असताना एमहॉफ यांचे कुटुंबातील नॅनीशी विवाहबाह्य संबंध प्रस्थापित झाले होते. या नात्यातून नॅनी गर्भवतीही राहिली. त्यांनी त्या बाळाचा जन्म होऊ दिला नाही.‘ डेली मेल’ ने याबाबत नॅनीशी संपर्क साधला असता आता या प्रसंगातून बाहेर आल्यामुळे काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला. डग एमहॉफ आणि पत्नी कर्स्टिन अमेरिकन चित्रपट निर्माते म्हणून ओळखले जातात. लग्नाच्या १६ वर्षांनंतर २००८ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. या लग्नातून त्यांना दोन मुले आहेत. घटस्फोटानंतर पत्नी कर्स्टिनने एमहॉफ हे आडनाव लावण्याचा कायदेशीर आणि व्यावसायिक अधिकार मिळविला आहे. डग एमहॉफ यांनी २०१४ साली कमला हॅरिस यांच्याशी विवाह केला.

गेल्या आठवड्यात रिपब्लिकन पक्षाचे उपाध्यक्षपदाचे दावेदार जेडी व्हान्स यांनी कमला हॅरिस यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर हॅरिस यांच्या समर्थनार्थ एमहॉफ यांच्या पहिल्या पत्नी कर्स्टिन मैदानात उतरल्या होत्या. २०१४ साली लग्न होऊनही कमला हॅरिस यांनी स्वतः मुलांना जन्म दिला नाही, असा आरोप रिपब्लिकन नेत्याने केला होता. या आरोपाला प्रत्युत्तर देताना कर्स्टिन म्हणाल्या होत्या की, २०१४ पासून हॅरिस यांनी माझ्या दोन मुलांचे पालकत्व स्वीकारले आहे. आम्ही तिघे मिळून आमच्या दोन्ही मुलांचे संगोपन करत आहोत.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन हे अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरिस चर्चेत आल्या. आशियाई-अमेरिकी आणि आफ्रिकी-अमेरिकी वंशाच्या कमला हॅरिस २०२० मधील अध्यक्षीय निवडणुकीनंतर अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष बनल्या. इतक्या उच्च पदावर जाणाऱ्या त्या पहिल्याच मिश्रवर्णी महिला ठरल्या आहेत. त्यांची आई श्यामला गोपालन या तमीळ तर वडील डोनाल्ड जे. हॅरिस हे जमैकन-अमेरिकन होते. कायदा या विषयात उच्च शिक्षण घेतल्यानंतर सुरुवातीस त्या कॅलिफोर्निया राज्यात प्रशासकीय आणि कायदा क्षेत्रात नोकरी करत होत्या. पुढे डिस्ट्रिक्ट ॲटर्नी, ॲटर्नी जनरल आणि सिनेटर असा त्यांचा प्रवास राहिला. २०१६ मध्ये अमेरिकेच्या सिनेटमध्ये दाखल झालेल्या त्या दुसऱ्या आफ्रिकी-अमेरिकी महिला आणि पहिल्या आशियाई-अमेरिकी महिला ठरल्या.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest