इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची खिल्ली उडविणाऱ्या पत्रकाराला दंड

रोम: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची समाजमाध्यमावर खिल्ली उडवल्याबद्दल मिलानमधील न्यायालयाने एका पत्रकाराला ५,००० युरोचा (५,४६५ डॉलर) नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 20 Jul 2024
  • 11:15 am
Journalist, Giorgia Melon, Italy

संग्रहित छायाचित्र

रोम: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची समाजमाध्यमावर खिल्ली उडवल्याबद्दल मिलानमधील न्यायालयाने एका पत्रकाराला ५,००० युरोचा (५,४६५ डॉलर) नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहेत.

तसेच पत्रकार गिउलिया कोर्टेस यांनाही १,२०० युरोचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यांनी २०२१ साली जॉर्जिया मेलोनी यांच्या उंचीवरून खिल्ली उडवणारे ट्विट (आत्ताचे एक्स) केले होते. या ट्विटमधला मजकूर बॉडी शेमिंग करणारा असल्याचे मानले गेले होते. त्या संदर्भात त्यांना १,२०० युरोचा दंड भरावा लागणार आहे. या निकालासंदर्भात कोर्टेस ‘एक्स’वर म्हणतात की, इटलीच्या सरकारला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि पत्रकारितेतील मतभेदांचे वावडे आहे.’ तीन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर भांडण झाल्यानंतर मेलोनी यांनी कोर्टेस यांच्यावर कायदेशीर कारवाई केली होती.

जॉर्जिया मेलोनी त्यावेळी विरोधी पक्षात होत्या. कॉर्टेस यांनी मेलोनी यांची तुलना दिवंगत फॅसिस्ट नेते बेनिटो मुसोलिनी यांच्या बरोबर केली होती. त्यावरून या वादाला सुरुवात झाली. यावेळी कॉर्टेस यांनी प्रतिवाद करताना मेलोनी यांना उद्देशून म्हटले होते, तू मला घाबरवू नकोस, जॉर्जिया मेलोनी. शेवटी, तू फक्त १.२ मीटर (४ फूट) उंच आहेस. मी तुला पाहूही शकत नाही. विविध संकेतस्थळांवर मेलोनी यांची उंची १.५८ ते १.६३ मीटर या दरम्यान असल्याचे म्हटले आहे. कोर्टेस या शिक्षेविरुद्ध अपील करू शकतात. मेलोनी यांच्या वकिलांनी सांगितले की, पंतप्रधान त्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईची रक्कम दान धर्मासाठी वापरतील. गुरुवारी ‘एक्स’वर कोर्टेस म्हणाल्या की, इटलीमधील स्वतंत्र पत्रकारांसाठी हा कठीण काळ आहे. पुढच्या चांगल्या दिवसांची आशा करू या. आम्ही हार मानणार नाही!

या वर्षी इटलीमध्ये पत्रकारांविरुद्ध मोठ्या संख्येने खटले दाखल करण्यात आले. त्यामुळे २०२४ च्या जागतिक पत्रकार स्वातंत्र्य निर्देशांकात इटली ४६ व्या स्थानावर गेले आहे. पत्रकारांना न्यायालयात नेणे मेलोनी यांना नवीन नाही. २०२१ मध्ये बेकायदेशीर इमिग्रेशनवरील त्यांच्या कठोर भूमिकेबद्दल बेस्ट-सेलिंग रॉबर्टो सॅव्हियानोने टीका केल्यामुळे गेल्या वर्षी रोम न्यायालयाने त्याला १,००० युरोचा दंड ठोठावला होता. वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest