वॉशिंग्टन : कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात आघाडीवर असलेल्या एनवीडिया कंपनीचे संस्थापक सीईओ जेन्सन ह्युआंग यांचा लिंक्डइनवरील प्रोफाइल जाहीर झाला असून त्यातील माहितीनुसार भूतकाळात त्यांनी डिशवॉशर, बसबॉय आणि वेटर अशी कामे केल्याचा उल्लेख आहे.
एकेकाळी अशी दुय्यम दर्जाची कामे करणाऱ्या हुआंग यांनी बुद्धिमतेच्या जोरावर मोठी भरारी मारली असून त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये एका दिवसात तब्बल ४ बिलियन डॉलर्स इतकी अफाट भर पडली आहे. यामुळे सध्या हुआंग यांची जोरदार चर्चा आहे.
एनवीडिया ही जगातील सर्वात मौल्यवान सेमीकंडक्टर फर्म असून ती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अन्य क्षेत्रातही आघाडीवर आहे. एनवीडियाची भारतात चार अभियांत्रिकी विकास केंद्रे असून ती हैदराबाद, पुणे, गुरुग्राम आणि बेंगळुरू येथे कार्यरत आहेत. ब्लूमबर्गच्या मते, एनवीडिया कृत्रिम बुद्धिमत्तेतील आपला प्रवेगक अपग्रेड करण्याच्या प्रयत्नात आहे.
एनवीडियाचे शेअर गेल्या पाच वर्षांत तब्बल ३,७७६ टक्क्यांनी वाढले आहेत. स्थापनेनंतर अवघ्या पाच वर्षांत म्हणजेच जून २०२४ मध्ये कंपनी जगातील सर्वाधिक मूल्य असणारी कंपनी झाली. परिणामी कंपनीचे संस्थापक सीईओ हुआंग यांच्या एकूण संपत्तीमध्ये एका दिवसात तब्बल ४ बिलियन डॉलर्स इतकी भर पडली. आज हुआंग जगातील १२ व्या क्रमांकावरचे धनीक आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी नवोदित उद्योजकांमध्ये नेहमी उत्सुकता असताना त्यांच्या प्रोफाइलची चर्चा सुरू आहे.
प्रोफाईलवर हुआंग यांनी पूर्वानुभव नमूद केला आहे. अब्जावधींची संपत्ती गाठीशी असणारे हुआंग यांचा लिंक्डइन प्रोफाइल म्हणजे डझनभर कंपन्यांमधला अनुभव, महत्त्वाच्या पदांच्या जबाबदाऱ्या आणि भरगच्च असा पूर्वानुभवाचा रकाना अशा गोष्टींची साधारण कल्पना केली जाईल. वास्तवात हुआंग यांच्या प्रोफाइलवर फक्त दोन ठिकाणी काम केल्याचा उल्लेख आहे. पूर्वानुभवाच्या रकान्यात त्यांनी डिशवॉशर, बसबॉय आणि वेटर म्हणून काम केल्याचे नमूद केले आहे. १९७८ ते १९८३ या पाच वर्षांत डॅनीज नावाच्या एका हॉटेलमध्ये हुआंग यांनी हे काम केलं होतं. त्यानंतरचा त्यांचा अनुभव थेट एनविडियाचे संस्थापक व सीईओ म्हणून आहे. १९९३ सालापासून त्यांनी एनविडियाचे सीईओ म्हणून काम केले आहे. त्यांचा आत्तापर्यंतचा हा अनुभव तब्बल ३१ वर्ष ८ महिने आहे.
६१ वर्षीय हुआंग यांनी याआधीही पूर्वायुष्याबाबत खुलासे केले आहेत. मार्चमध्ये हुआंग यांनी स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये डॅनीजसाठी काम केल्याचा उल्लेख केला होता. ते म्हणाले, माझ्यासाठी कोणतंही काम छोटं नाही. कारण मी डिशवॉशर म्हणून काम केलं आहे. मी शौचालये साफ करायचो. मी खूप सारी शौचालयं साफ केली आहेत.
लिंक्डइन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रामुख्याने व्यावसायिक स्वरूपाच्या अपडेट्स, रोजगारासंदर्भातल्या पोस्ट आणि तत्सम इतर अपडेट्स शेअर होत असतात. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण मंडळींपासून बाजारपेठेतील दिग्गजांपर्यंत सर्वांचे प्रोफाइल त्यांच्याविषयीची व्यावसायिक स्वरूपाची माहिती येथे उपलब्ध असते.