शिगेरू इशिबा
टोकियो : जपानचे संरक्षणमंत्री शिगेरू इशिबा यांनी शुक्रवारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (एलडीपी) निवडणुकीत विजय मिळवल्याने आता देशाचे नवे पंतप्रधान असतील. पुढील आठवड्यात १ ऑक्टोबरला संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर ते पदभार स्वीकारतील.
जपानमध्ये सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षाची पंतप्रधान म्हणून निवड होते. संसदेच्या दोन्ही सभागृहांत ‘एलडीपी’ चे बहुमत आहे. त्यामुळे पक्ष अध्यक्षपदी निवड झालेले इशिबा जुलै २०२५ पर्यंत पंतप्रधानपदावर असतील. यानंतर सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. ६७ वर्षीय इशिबा यांनी प्रतिस्पर्धी साने तकायची यांचा २१ मतांच्या फरकाने पराभव केला.
इशिबा यांना पक्षाच्या सदस्यांची २१५ मते मिळाली. इशिबा यांनी यापूर्वी चार वेळा पक्ष नेतृत्वासाठी निवडणूक लढवली आहे. २०१२ मध्येही ते शिंजो आबे यांच्या विरोधात उभे राहिले होते. त्यांना चारहीवेळा पराभवाला सामोरे जावे लागले होते. निवडणूक जिंकल्यानंतर इशिबा म्हणाले, आता पक्ष नव्याने उभा राहील आणि लोकांचा विश्वास जिंकेल. माझ्या सत्तेच्या काळात जनतेशी आपण प्रामाणिक राहू. देश सुरक्षित आणि समृद्ध करण्यासाठी आपण काम करू.
इशिबा १९८६ मध्ये वयाच्या २९ व्या वर्षी त्यांनी पहिली निवडणूक जिंकली. इशिबा हे संरक्षण आणि कृषिमंत्री राहिले आहेत. यावेळी त्यांनी प्रचारात देशातील अणुऊर्जा प्रकल्प हळूहळू बंद करण्याचे आश्वासन दिले. चीन आणि उत्तर कोरियासारख्या धोक्यांना तोंड देण्यासाठी आशियामध्ये नाटो तयार करण्याबाबतही ते बोलले. इशिबा पंतप्रधान किशिदा यांच्यावर टीका करतात. एलडीपीच्या धोरणांच्या विरोधात, ते जपानमध्ये महिला सम्राट निर्माण करण्याचा पुरस्कार करतात. त्यामुळे पक्षातील अनेक नेते त्यांच्या विरोधात आहेत.
एलडीपीच्या बहुतेक सदस्यांचा असा विश्वास आहे की महिलांनी आई आणि पत्नीची पारंपरिक कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. जपानचे सध्याचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी १४ ऑगस्ट रोजी पक्षाची निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. २०२१ मध्ये त्यांची लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ या महिनाअखेर संपणार आहे. या काळात किशिदा यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप झाले असून त्यामुळे त्यांची लोकप्रियता कमालीची घटली आहे.