संग्रहित छायाचित्र
जेरुसलेम : इस्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) हमास आणि राफामध्ये युद्ध करत असले तरी त्यांनाही पत्नी आणि मुलांच्या सुरक्षेची काळजी वाटत असून त्यांच्यासाठी त्यांनी आजीवन सुरक्षेची मागणी केली आहे. एका वृत्तानुसार नेतन्याहू यांनी इस्राएलची देशातील गुप्तचर संस्था शिन बेतकडे पत्नी, मुलाच्या आजीवन सुरक्षा तपशीलावर अहवाल मागवला होता.
शिन बेतने सध्या या विषयावर काहीही चर्चा करू नये असा सल्ला दिला आहे. शिन बेतने त्यांचा प्रस्ताव स्वीकारला तर नेतान्याहू यांच्या कुटुंबाला ते पंतप्रधान नसतानाही सुरक्षा मिळत राहील. इस्राएलच्या पंतप्रधान कार्यालयाने मात्र हे वृत्त खोटे म्हटले आहे. त्याचवेळी, असा दावा केला आहे की नेतन्याहू यांचा मुलगा यायर दक्षिण अमेरिकेतील ग्वाटेमालामध्ये शिन बेत सुरक्षा रक्षकांसोबत फिरताना दिसत आहे. ८ ऑक्टोबर २०२३ रोजी युद्ध सुरू झाल्यापासून यायर अमेरिकेत आहे. इस्राएलच्या नियमांनुसार, माजी पंतप्रधानांच्या कुटुंबाला त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर पहिल्या सहा महिन्यांसाठी सुरक्षा मिळते. नेतन्याहू यांनी २०१९ मध्ये मंत्री समितीद्वारे ही मर्यादा एका वर्षाने वाढवली होती. काही काळानंतर त्याच मंत्री समितीने पुन्हा सहा महिन्यांची सुरक्षा पुरवण्याची मुदत कमी केली. 'शिन बेत' या गुप्तचर संस्थेने ही शिफारस स्वीकारली होती. २०२१ मध्ये, शिन बेत म्हणाले की नेतान्याहूंची पत्नी किंवा मुलांना कोणताही धोका नाही.
नेतान्याहू रविवारी म्हणाले की, युद्धविराम करार झाला तरी ते हमासविरुद्धचे युद्ध संपवणार नाहीत. इस्राएली ओलीसांच्या सुटकेच्या बदल्यात आपण काही काळासाठी युद्धविराम करण्यास तयार आहेत, परंतु हमासविरुद्धचे युद्ध संपवणार नाहीत. गाझामधील युद्धाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आता संपला आहे.
त्याचबरोबर युद्धविराम करार झाला नसल्याने इस्राएलमध्ये नेतान्याहू यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. रविवारी इस्राएलमध्ये ओलिसांच्या कुटुंबीयांनी पंतप्रधानांविरोधात निदर्शने केली. ते म्हणाले की, युद्धाला ८ महिने उलटूनही त्यांचे सरकार ओलीसांची सुटका करू शकलेले नाही. नेतान्याहू त्यांच्या राजकारणासाठी युद्ध लांबवत आहेत. इस्राएलचा इतिहास पाहिला तर पंतप्रधानांचा कार्यकाळही युद्धानेच संपतो. ज्या पंतप्रधानांच्या काळात युद्ध झाले, त्यांना खुर्ची सोडावी लागली. असे एक-दोनदा नव्हे तर तीनदा घडले आहे. इस्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना कोणी त्यांना जादूगार म्हणतो, कोणी राजा बीबी तर कोणी मिस्टर सिक्युरिटी. बहुमत नसतानाही सरकार स्थापन करण्यात त्यांना यश आले. याच कारणामुळे ते पराभवाच्या जबड्यातून विजय खेचून आणतात, असे त्यांच्याबद्दल बोलले जाते.