संग्रहित छायाचित्र
तेल अविव : इस्राएलचे हमासशी गाझा पट्टीत युद्ध सुरू असताना एक वेगळी गोष्ट निदर्शनास आली आहे. युद्धात मरण पावलेल्या आपल्या सैनिक मुलाच्या शुक्राणूंचे (स्पर्म) जतन करणाऱ्या आई-वडिलांची संख्या इस्राएलमध्ये वाढत आहे.
ही प्रक्रिया राबवण्याची कायदेशीर नियमावली लांबलचक आणि किचकट आहे. मरण पावलेल्या व्यक्तीच्या शुक्राणूंचे जतन किंवा त्याचा वापर करण्यासंदर्भात इस्राएलमध्ये काही नियम होते. या किचकट नियमांबाबत सैनिकांच्या कुटुंबीयांमध्ये कमालीची नाराजी होती. गेल्या वर्षी सात ऑक्टोबरला हमासने इस्राएलवर अभूतपूर्व हल्ला केला. त्या हल्ल्यानंतर शुक्राणू जतन करून ठेवण्यासंदर्भातील नियम शिथिल केले आहे.
अवी हारुश या नागरिकाचा २० वर्षांचा मुलगा रीफ गेल्या ६ एप्रिलला गाझा पट्टीत सुरू असलेल्या लढाईत मारला गेला. आपला तरणाबांड मुलगा गेल्याने अवी हारुश यांचा कंठ दाटून येतो. या घटनेनंतर लष्कराचे अधिकारी अवी हारुश यांच्या घरी आले होते. त्यांनी अवी यांच्यासमोर एक पर्याय ठेवला होता. त्यांनी रीफचे शुक्राणू जत करता येतील, त्यासाठी ते तयार आहेत का, अशी विचारणा केली. यावर रीफचे वडील अवी हारुश लगेच तयार झाले. ते म्हणतात, रीफ त्याचे आयुष्य मनसोक्त जगला. तो गेल्यानं आमचे कधीही भरून येणार नाही असे नुकसान झाले आहे. तरीही आम्ही आयुष्याला सामोरे जात आहे. रीफला मुलांची आवड होती. त्याला स्वत:ची मुलं हवी होती, यात शंका नाही. त्याचे लग्न झालेले नव्हते, तसेच त्याला प्रेयसीही नव्हती. त्यामुळे त्याच्या शुक्राणूंचा वापर करण्यासंदर्भात अडचणी होत्या. रीफ यांच्या कहाणीनंतर अनेक महिला पुढे आल्या आणि त्यांनी रीफच्या बाळाला जन्म देण्याचा प्रस्ताव दिला. अवी म्हणतात, रीफच्या बाळाला जन्म देणे आणि त्याच्या मुलाच्या रूपात मुलाला पाहणे एवढेच आमच्या आयुष्याचे ध्येय आहे.
हमासनं इस्राएलवर केलेल्या हल्ल्यात जवळपास १२०० लोक मारले गेले होते. जवळपास २५१ इस्राएली नागरिकांना हमासनं ओलीस ठेवले होते. इस्राएली सैन्याच्या कारवाईत आतापर्यंत ३९ हजारांपेक्षा अधिक पॅलेस्टिनी लोक मारले गेले आहेत.