संग्रहित छायाचित्र
जेरुसलेम : इस्राएली लष्कराने मंगळवारी गाझातील शाळेवर केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये २९ जणांचा मृत्यू झाला आहे.एका आठवड्यातील हा दुसरा हल्ला असून ज्यात शाळेवर हल्ले केले आहे. ज्या शाळेवर हा हल्ला झाला तेथे निर्वासितांना ठेवण्यात आले होते. गेल्या ४ दिवसांपासून निर्वासितांना ठेवलेल्या ठिकाणांवर इस्राएल हल्ले करत आहे. आता इस्राएली लष्कराने पॅलेस्टिनी जनतेला खान युनिस हा भाग सोडण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर तेथील तीन मोठी रुग्णालये बंद करावी लागली.
संयुक्त राष्ट्राने हा हल्ला अतिशय धोकादायक पाऊल असल्याचे म्हटले आहे. खान युनिसमधून लोकांना बाहेर काढण्यासाठी आणखी वेळ द्यावा, असेही म्हटले आहे. या काळात इस्राएलने निर्वासितांवर हल्ले करू नयेत, असेही सूचवले आहे. इस्राएली लष्कराने सांगितले की, शनिवारपासून गाझामधील शाळांवर तीन हल्ले झाले आहेत. इस्राएली लष्कराने शनिवारी गाझा येथील एका शाळेवर हवाई हल्ला केला. त्यात १६ जणांचा मृत्यू झाला असून ७५ हून अधिक जण जखमी झाले आहेत.ही शाळा संयुक्त राष्ट्रांच्या ताब्यात असून तेथे निर्वासितांना ठेवले होते. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, इस्राएली सैन्याने आधी शाळेला घेराव घातला आणि त्यानंतर हल्ला केला. इस्राएलच्या हल्ल्यामुळे शाळेची इमारत कोसळली, त्यात राहणारी मुले ढिगाऱ्याखाली गाडले गेले. स्थानिक लोकांनी बचावकार्य केले. वाचलेल्या दोन मुलांपैकी एका मुलीच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. दुसऱ्या मुलाच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर अनेक जखमा झाल्या आहेत. संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यातही इस्राएली लष्कराने एका शाळेला लक्ष्य केले होते.
पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, मृतांमध्ये बहुतेक मुले आणि महिलांचा समावेश आहे ५० जखमींवर उपचार सुरू आहेत, उर्वरितांवर घटनास्थळीच उपचार करण्यात आले. इस्राएली लष्कराने शाळेचे वर्णन दहशतवाद्यांचा तळ असे केले आहे.