संग्रहित छायाचित्र
जेरुसलेम: इस्राएल आणि हिजबुल्लाहमध्ये युद्ध सुरू होण्याची दाट शक्यता आहे. शनिवारी इस्राएलव्याप्त गोलन टेकड्यांवर इराण समर्थक मिलिशिया हिजबुल्लाहने हल्ला केला होता. हल्ल्यात १२ इस्राएली नागरिकांचा मृत्यू झाल्यावर इस्राएली सैन्याने दक्षिण आणि पूर्व लेबनॉनमधील गावे आणि शहरांवर जोरदार बॉम्बफेक केली. यामुळे भारताने लेबनॉनमधील नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. राजधानी बैरुतमधील भारतीय दूतावासाने लेबनॉनमधील भारतीयांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी आपत्कालीन फोन नंबर आणि ईमेल आयडी दिला आहे.
इस्राएल हिजबुल्लाहवर मोठ्या प्रमाणावर हल्ला करण्याची तयारी करत आहे. त्यासाठी इस्राएलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी तेल अवीवमध्ये सुरक्षा मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. इराणनेही इस्राएलला उघडपणे युद्धाची धमकी दिली आहे. शनिवारी झालेल्या हल्ल्यानंतर इस्राएलने लेबनॉनवर ड्रोन हल्ले सुरू केले आहेत. दक्षिण लेबनॉनमध्ये रविवारी रात्री उशिरा झालेल्या ड्रोन हल्ल्यात दोन जण ठार, तर तीन जखमी झाले. इस्राएलच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर लेबनॉनमधील हवाई सेवा बंद करण्यात आली आहे. लेबनॉनच्या मिडल ईस्ट एअरलाइन्सने सांगितले की, शंभरहून अधिक उड्डाणे रद्द झाली आहेत.
लुफ्थांसा एअरलाइन्सने ३० जुलैपर्यंत ५ मार्गांवरील उड्डाणे रद्द केली आहेत. बैरुत रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे लेबनॉनमधील एकमेव विमानतळ आहे. इस्राएलसोबतच्या युद्धात आणि गृहयुद्धाच्या काळात याच विमानतळाला लक्ष्य केले आहे. बैरुतमधील नॉर्वेजियन दूतावासाने लेबनॉन-इस्राएल संघर्ष वाढल्याचा इशारा दिला आहे. दूतावासाने नागरिकांना देश सोडण्यास सांगितले आहे. परिस्थिती बिघडल्यास लेबनॉनच्या बाहेर प्रवासाचे पर्याय मर्यादित असू शकतात, असे म्हटले आहे
इराण समर्थक दहशतवादी संघटना हिजबुल्लाहने शनिवारी इस्राएलवर गेल्या १० महिन्यांतील सर्वात मोठा हल्ला केला. गोलन टेकड्या भागात फुटबॉल मैदानावर दहशतवादी संघटनेने लेबनॉनमधून रॉकेट डागले. या हल्ल्यात १२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३० जण जखमी झाले आहेत. टाइम्स ऑफ इस्राएलच्या वृत्तानुसार, मृतांमध्ये बहुतेक १० ते २० वर्षे वयोगटातील मुले आहेत.
अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले इस्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हल्ल्याची माहिती मिळताच तातडीने मायदेशी परतले. हिजबुल्लाहने सुरुवातीला हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, काही वेळाने त्यांनी आपले म्हणणे मागे घेतले. इस्राएलच्या लष्कराने म्हटले आहे की, हा हल्ला फलाक-१ रॉकेटच्या साह्याने करण्यात आला. याचा वापर फक्त हिजबुल्लाहकडून केला जातो.
इस्राएलचे परराष्ट्रमंत्री इस्राएल कॅटझ म्हणाले की, हिजबुल्लाहने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. आम्ही दहशतवादी संघटनेसोबत युद्धाच्या अगदी जवळ आलो आहोत. हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर दोघांमधील संघर्षाचा धोका वाढला आहे. वास्तविक, इस्राएल आणि हिजबुल्लाह काही काळापासून सतत एकमेकांवर हल्ले करत आहेत. ते लेबनॉनला अश्मयुगात पाठवू शकतात, असे इस्राएलचे संरक्षणमंत्री योव गॅलंट यांनी सांगितले. त्याचवेळी हिजबुल्लाहचा नेता हसन नसरुल्लाह याने इस्राएलचे विमानतळ आणि सायप्रसवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. लेबनॉन-इस्राएल सीमेवर दोघांमधील वैर वाढत असल्याचे हिजबुल्लाहचे उपप्रमुख शेख नईम कासिम यांनी म्हटले होते. इस्राएली सैन्याने लेबनॉनमध्ये पोहोचले तर आम्ही त्याच्या सीमेवर नाश करू.
याआधी शनिवारी संध्याकाळी इस्राएली लष्कराने गाझा येथील एका शाळेवर हवाई हल्ला केला. त्यात किमान ३० पॅलेस्टिनी ठार, तर १०० हून अधिक लोक जखमी झाले. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बहुतांश मुले आहेत.