संग्रहित छायाचित्र
तेल अवीव : शनिवारी रात्री २ वाजून १५ मिनिटाने इस्राएलने इराणवर थेट हवाई हल्ला केला. १ ऑक्टोबर रोजी इराणने इस्राएलवर १८० क्षेपणास्त्र डागले होते. इराणमधील १० लष्करी तळांना लक्ष्य केले गेले आहे. हा हल्ला फक्त लष्करी तळापुरताच मर्यादित होता. असा दावा इस्राएलने केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून २५ दिवसांनंतर इस्राएलकडून सदर हल्ला केला गेल्याचे इस्राएल डिफेन्स फोर्सने एक्सवर पोस्ट करून सांगितले आहे.
इराणच्या लष्करी तळांवर पहाटे ५ वाजेपर्यंत इस्राएलचे हल्ले करण्यात आले. या हल्ल्यामध्ये क्षेपणास्त्र २० कारखाने उद्ध्वस्त करण्यात आले. या हल्ल्यानंतर आता दोन्ही देशांमध्ये युद्ध भडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. इस्राएलने दिलेल्या माहितीनुसार, इतर ठिकाणी हल्ले झाले नाहीत, असा दावा इस्राएलने केला आहे. इराणचे या हल्ल्यात किती नुकसान झाले, याबाबतची माहिती मात्र अद्याप मिळू शकलेली नाही.
दरम्यान हे हल्ले कुठून, कसे करण्यात आले, याची मात्र कोणतीही माहिती दिली गेली नाही. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, इस्राएलने ३ तासांत २० इराणी लक्ष्यांवर हल्ले केले. इस्राएल वेळेनुसार हा हल्ला पहाटे २ वाजून १५ मिनिटांनी सुरू झाला. ५ वाजेपर्यंत हल्ले सुरूच होते. यामध्ये क्षेपणास्त्र कारखाने आणि लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले.
इस्राएलच्या संरक्षण दलाने इराणवरील हल्ल्याची माहिती स्थानिक वेळेनुसार २ वाजून ३० मिनिटांनी दिली होती. इस्राएल संरक्षण दलाचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी सांगितले की, १ ऑक्टोबरच्या हल्ल्याला उत्तर म्हणून इस्राएल इराणवर हल्ला करत आहे.
इराणच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, तेहरानच्या इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ हे हल्ले झाले. हवाई हल्ल्यानंतर अमेरिकेने इस्राएलचे समर्थन करत इराणच्या हल्ल्याला प्रत्युत्तर असल्याचे म्हटले आहे. इस्राएल आणि इराणनेही हवाई क्षेत्र बंद केले आहे.
अल्जझीराच्या वृत्तानुसार इस्राएल आणि इराणने आपली हवाई हद्द बंद केली आहे. इस्राएली अधिकाऱ्यांनी सांगितले की, इस्राएलचे हवाई क्षेत्र भारतीय वेळेनुसार सकाळी ११ वाजेपर्यंत बंद राहील. त्याचवेळी भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजेपर्यंत हवाई क्षेत्र बंद राहणार असल्याची माहिती इराकी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
इराणने केले हवाई क्षेत्र बंद
इराणने आपली हवाई हद्द बंद केली आहे. सीएनएनच्या म्हणण्यानुसार, शनिवारी (भारतीय वेळेनुसार) रात्री ११ वाजेपर्यंत ते बंद राहील, सीएनएनने फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइटराडर २४ च्या हवाल्याने म्हटले आहे की हल्ल्याच्या वेळी तेहरानच्या हवाई क्षेत्रात चार विमाने उडत होती.
आण्विक तळावर आणि तेलाच्या साठ्यांवर हल्ला नाही
एनबीसीने इस्राएली अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, इस्राएल इराणच्या आण्विक केंद्रावर किंवा कोणत्याही तेलाच्या साठ्यावर हल्ला करत नाही. ते फक्त त्यांच्या लष्करी तळाला लक्ष्य करत आहेत. अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही अशा गोष्टींना लक्ष्य करत आहोत ज्या भूतकाळात आमच्यासाठी धोकादायक होत्या आणि भविष्यात धोका बनू शकतात.
इस्राएलने दुसऱ्यांदा इराणवर हल्ल्याचा दावा
आयडीएफने पुन्हा एकदा इराणवर हल्ला केल्याचा दावा इस्राएलच्या न्यूज १२ वाहिनीने केला आहे. इराणमधील शिराजमध्ये हा हल्ला झाला. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
तेहरानजवळील लष्करी तळ हे टार्गेट
इराणच्या फार्स वृत्तसंस्थेने सांगितले की, तेहरानच्या पश्चिम आणि दक्षिणेकडील अनेक लष्करी लक्ष्यांवर हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात किती नुकसान झाले याची माहिती मिळू शकलेली नाही. त्याचवेळी इराणच्या सरकारी टीव्हीने तेहरानमधील इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मेहराबाद विमानतळावर परिस्थिती सामान्य असल्याचे वृत्त दिले आहे. इस्राएल युद्ध मंत्रिमंडळाने फोनवर मतदान केले, इराणवरील हल्ल्याला मान्यता दिली.
इराणवरील हल्ल्याला इस्राएलच्या पीएमओने युद्ध मंत्रिमंडळाने एकमताने मंजुरी दिली. सीएनएनच्या म्हणण्यानुसार, हल्ल्यापूर्वी फोन कॉलवर हे मतदान झाले. हल्ल्यापूर्वी पंतप्रधान नेतन्याहू यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते.
अमेरिका हल्ल्यात सहभागी नाही
अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने सीएनएनला सांगितले की, इराणवरील इस्राएली हल्ल्यात त्यांचा देश सहभागी नव्हता. व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्याने सांगितले की, इस्राएलने स्वसंरक्षणार्थ हे हल्ले केले आहेत. अध्यक्ष बायडेन सध्या डेलावेअरमध्ये आहेत. मात्र, आम्ही त्यांना हल्ल्याची माहिती दिली आहे. ते या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहेत.
इराणमधील सरकारकडून इस्राएल राज्याविरुद्ध अनेक महिन्यांच्या सततच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून—सध्या इस्राएल संरक्षण दल इराणमधील लष्करी लक्ष्यांवर अचूक हल्ले करत आहेत. इराण आणि स्थानिक दहशतवादी संघटना आणि त्यांचे भाडोत्री सैन्य ७ ऑक्टोबर २०२३ पासून इस्राएलवर चहूबाजूंनी हल्ला करत आहे. इराणच्या भूमीवरून तर इस्राएलवर थेट निरंतर हल्ले करत आहे. जगातील इतर सार्वभौम देशांप्रमाणेच इस्राएललाही त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे. इस्राएल राज्य आणि इस्राएलच्या लोकांचे रक्षण करण्यासाठी आम्ही जे काही आवश्यक आहे ते करू.
- डॅनियल हगारी, प्रवक्ते इस्राएल डिफेन्स फोर्स (आयडीएफ)