संग्रहित छायाचित्र
तेल अविव: इस्राएलचे गाझा पट्टीतील युद्ध सुरू असताना आता या युद्धाला आणखी एक वळण मिळाले आहे. आग्नेय दिशेला असलेल्या येमन देशातील हुथी बंडखोराच्या नियंत्रणाखाली असलेल्या होदेइदाह बंदरावर इस्राएलने रविवारी पहाटे हल्ला केला. त्यामुळे आता या युद्धात आणखी काही देश अथवा दहशतवादी संघटना सक्रिय होण्याची शक्यता आहे.
इस्राएलच्या एफ-१५ लढाऊ विमानांनी सुमारे १७०० किमी अंतर पार करत लाल समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या होदेइदाहवर बॉम्ब टाकले आहेत. यामध्ये तीन ठार आणि ८० पेक्षा जास्त जखमी झालेत. यामध्ये मुख्यतः बंदरावर असलेला इंधनसाठा आणि गोदामांना लक्ष्य करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यात लाल समुद्रात प्रवास करणाऱ्या मालवाहू जहाजांवर हुथी बंडखोरांनी ड्रोनद्वारे हल्ले चढवले आहेत. एवढेच नाही तर शुक्रवारी (१९ जुलै) इस्राएलची राजधानी असलेल्या तेल अवीव शहरावर ड्रोनने हल्ले केले. याला प्रत्युत्तर म्हणून इस्राएलने हा हल्ला चढवला आहे.
आमच्यावर कोणी हल्ला केला तर त्याची जबर किंमत चुकवावी लागेल, अशी प्रतिक्रिया इस्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिली आहे. तर ज्या बंदरावरून इराणची शस्त्रवाहतूक केली जाते त्या बंदराला लक्ष्य करण्यात आल्याची प्रतिक्रिया इस्राएलच्या नौदल अधिकाऱ्यांनी दिली आहे.