संग्रहित छायाचित्र
जेरुसलेम : इस्राएलने लेबनॉनमध्ये प्रचंड विध्वंस घडून आणला आहे. गेल्या दोन दशकातील भीषण हल्ला इस्राएलने लेबनॉनवर केला आहे. या हल्ल्यात ४०० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ९० हून अधिक महिला व लहान मुलांचा समावेश आहे. २००६ मध्ये इस्राएल आणि हिजबुल्लाह यांच्यातील युद्धानंतरचा हा सर्वात भीषण हल्ला मानला जातो. अमेरिकेने मध्यपूर्वेतील वाढता तणाव पाहता मोठ्या संख्येने सैनिक पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या हल्ल्यांबाबत अमेरिकन सरकार अत्यंत चिंतेत असल्याचे बोलले जात आहे.
सोमवारी (२६ सप्टेंबर) इस्राएलने लेबनॉनमध्ये हवाई हल्ले सुरू केले. तसेच हे हल्ले आणखी तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती देखील इस्राएलने दिली. लेबनॉनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोमवारी झालेल्या हल्ल्यांमध्ये ४९० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. लेबनीज आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार ४९२ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ३५ मुले आणि ५८ व महिलांचा समावेश आहे. तर १६४५ जण जखमी झाले आहेत.
इस्राएलने दिली होती पूर्वकल्पना
या हल्ल्यानंतर हजारो लेबनीज नागरिक दक्षिणेकडे पळून गेल्याचे वृत्त आहे. २००६ नंतरचे हे सर्वात मोठे स्थलांतर आहे. इस्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही लेबनॉनच्या नागरिकांना हा परिसर रिकामा करण्याचे आवाहन केले होते. विशेषत: पूर्व आणि दक्षिण लेबनॉनमधील नागरिकांसाठी एक चेतावणी जारी करण्यात आली. हा इशाराही त्यांनी गांभीर्याने घेण्यास सांगितले. ते म्हणाले होते, 'आमचे ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सुरक्षितपणे तुमच्या घरी परत येऊ शकता. इस्राएलच्या लष्कराचे प्रवक्ते रिअर ॲडमिरल डॅनियल हगारी म्हणाले की, लेबनॉनच्या इस्राएलच्या सीमेवरून हिजबुल्लाहला नष्ट करण्यासाठी जे काही आवश्यक असेल ते लष्कर करेल. हवाई हल्ल्यामुळे हिजबुल्लाहचे मोठे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी सोमवारी केला. गरज भासल्यास इस्राएल लेबनॉनमध्ये जमिनीवर हल्ला करण्यास देखील तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, 'आम्हाला युद्ध नको आहे. आम्हाला जोखीम कमी करायची आहे. 'हे मिशन पूर्ण करण्यासाठी आम्ही जे काही आवश्यक आहे ते करू. हिजबुल्लाहने ऑक्टोबरपासून इस्राएलवर ९ हजार रॉकेट डागले आहेत.
अमेरिका पश्चिम आशियामध्ये लष्कर वाढवणार
लेबनॉनमध्ये इस्राएल आणि हिजबुल्लाह सैन्यांमधील वाढता संघर्ष लक्षात घेऊन अमेरिका पश्चिम आशियामध्ये अतिरिक्त सैन्य तैनात करणार आहे. ज्यामुळे या परिसरात युद्ध आणखी भडकण्याचा धोका वाढला आहे. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने सोमवारी ही माहिती दिली. पेंटागॉनचे (संरक्षण विभाग) प्रेस सेक्रेटरी मेजर जनरल पॅट रायडर यांनी किती अतिरिक्त सैन्य पाठवले जाईल किंवा त्यांना कोणती कामे सोपवली जातील याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. अमेरिकेचे सध्या या प्रदेशात सुमारे ४०,००० हजार सैनिक तैनात आहेत. लेबनॉनमध्ये इस्राएली सैन्याने केलेल्या मोठ्या हल्ल्यानंतर त्यात पुन्हा वाढ करण्यात आली आहे.