संग्रहित छायाचित्र
इस्राएलने बुधवारी रात्री गाझामधील अल-जौनी शाळा आणि दोन घरांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यात ३४ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.मृतांमध्ये १९ महिला आणि ६ मुलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मृतांमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या पथकातील सहा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्राने असे हल्ले खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला आङे.
ही शाळा नुसरत निर्वासित शिबिरातील होती. ती संयुक्त राष्ट्रांच्या संकटकालीन प्रतिसाद विभागातर्फे चालवली जात होती. या शाळेत पॅलेस्टिनी निर्वासित राहत होते. या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, निर्वासितांचे वास्तव्य असलेल्या शाळेला लक्ष्य करण्याची बाब आम्ही कोणत्याही प्रकारे खपवून घेणार नाही. या शाळेत बारा हजारांहून अधिक निर्वासित आहेत. त्यामध्ये मुले आणि महिलांची संख्या सर्वाधिक आहे. त्यावर हल्ले करून इस्राएल आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करत आहे. हे आता थांबवण्याची गरज आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या संकटकालीन प्रतिसाद विभागाने म्हटले आहे की, युद्धास सुरुवात झाल्यापासून या शाळेवर ५ वेळा हल्ले झाले आहेत. यावेळी सर्वाधिक जीवितहानी झाली आहे. यापूर्वी संस्थेने इस्राएली लष्कराचे शाळेबाबत काही गैरसमज होते, जे आता संपले असल्याचे विधान केले होते. इस्राएली सैन्याने संयुक्त राष्ट्रांच्या दाव्यावर भाष्य केलेले नाही. तथापि, हल्ल्यानंतर लगेचच, इस्राएली संरक्षण दलाने सांगितले की ते हमासच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करत होते. हे दहशतवादी शाळेच्या आतून हल्ल्याची योजना आखत होते. दहशतवादी तेथे लपून बसल्याची माहिती मिळाली होती.
हल्ल्यातून बचावलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, लोक जेवणाची प्रतीक्षा करत असताना अचानक हल्ला झाला. त्यात अनेक लोक मारले गेले.
इस्राएल आणि हमासमध्ये सुरू झालेल्या युद्धाला ११ महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. इस्राएलच्या हल्ल्यात आतापर्यंत ४१ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच जवळ जवळ लाखाच्या आसपास जखमी झाले आहेत. इस्राएली लष्कराच्या हल्ल्यांमुळे गाझातील २३ लोकसंख्येपैकी ९० टक्के लोक अनेक वेळा विस्थापित झाले आहेत.इस्राएलने लक्ष्य केलेल्या शाळांमध्ये बहुतेक लोकांनी आश्रय घेतला आहे. युनिसेफच्या म्हणण्यानुसार, इस्राएली सैन्याच्या हल्ल्यात किमान ९० टक्के शाळांचे नुकसान झाले आहे.